

कणकवली: ही निवडणूक आमच्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आणि पक्ष संघटना मजबूत करणारी होती. येत्या 21 डिसेंबरला जेव्हा निकाल घोषित होईल तेव्हा ‘सब कुछ कमळ’, असे निकाल लागतील. चारही नगरपरिषदांवर भाजपच्या विचारांचा नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक भाजपचे विजयी होतील, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
मतदान संपल्यानंतर ओम गणेश निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सिंधुदुर्गात तीन नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीसाठी मतदारांनी विक्रमी मतदान केले आहे. आपण कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण या शहरातील मतदारांचे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आभार मानतो.
प्रत्येक मतदाराला आपला हक्क बजावण्याची संधी चांगल्या वातावरणात मिळाली आहे. एक दोन किरकोळ घटना सोडल्या तर जिल्ह्यातील सर्व वातावरण हे लोकशाहीला प्रोत्साहन देणारं होतं. भाजप पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचेही आपण आभार मानतो. अतिशय चांगली लढत चारही ठिकाणी दिलेली आहे.
या निवडणुकीत भाजपचे चारही ठिकाणी 4 नगराध्यक्ष आणि 81 नगसेवक पदाचे उमेदवार रिंगणात होते. संघटना म्हणून ही बाब आमच्यासाठी ताकद देणारी होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खा. नारायण राणे या सर्व नेत्यांनी जे काही सहकार्य, आशीर्वाद आम्हाला दिले त्याबद्दल त्यांनाही आपण धन्यवाद देतो.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली चारही ठिकाणी आम्ही निवडणुका लढवल्या, असे मंत्री राणे म्हणाले. ते म्हणाले, सिंधुदुर्गात आम्ही सर्व राजकीय कार्यकर्ते काम करत असताना निवडणूकीपुरते राजकारण असते, एरव्ही आम्ही सर्व खेळीमेळीच्या वातावरणात असतो. आज जेव्हा युती झाली नाही तेव्हा प्रत्येक नेत्याला आपापल्या पक्षाची बाजू मांडणे आवश्यक होते.
कुठल्याही गोष्टी वैयक्तिक झालेल्या नाहीत. ज्या गोष्टी घडल्या त्या निवडणूक आयोग आणि पोलिस यांच्या अंतर्गत आहेत. हा जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. इथे पर्यटक आणि गुंतवणूक येण्यासाठी चांगले वातावरण आहे. जिल्ह्याची प्रतिमा खराब होणार नाही याची आम्हाला जाणीव आहे. आता निवडणूक झाल्याने या सर्व गोष्टी संपल्या आहेत असे मंत्री राणे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले.