

कणकवली : ज्या रो-रो बोट सेवेची आपण सर्व वाट पाहत आहोत, त्या रो-रो बोट सेवेची मंगळवारी यशस्वी चाचणी झाली, तो दिवस ऐतिहासिक बनला आहे. याबाबत फायनल सर्व गोष्टी झाल्यानंतर येत्या दोन ते तीन दिवसांत रो-रो बोटीतून पॅसेंजर सर्व्हिसची सुरुवात केली जाणार आहे. या सेवेमुळे निश्चितपणे कोकणच्या रोजगार, पर्यटन आणि व्यापार या सर्व बाबींना गती मिळणार आहे. निश्चितपणे ही सेवा कोकणसाठी गेमचेंजर ठरेल, असा विश्वास सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
कुडाळ येथे सिंधुदुर्ग राजाचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ना. राणे म्हणाले, चाचणीसाठी मुंबईतून निघालेली रो-रो बोट प्रथम जयगडला थांबली आणि तेथून विजयदुर्गला आली. येत्या दोन- तीन दिवसांत पॅसेंजर सर्व्हिस सुरुवात केली जाणार आहे. कोकणवासीय चाकरमान्यांना त्यांच्या गावी घेऊन येण्यासाठी आणि पुन्हा मुंबईत जाण्यासाठी ही सेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट केल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर मंत्री राणे म्हणाले, मुख्यमंत्र्यांवर टीका झाली, तरी न्याय त्यांनीच दिलाच आहे. आरक्षण मागणी फार जुनी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी मुख्यमंत्री असताना राणे समिती अनुसार टिकणारे आरक्षण मराठा समाजाला दिले. आजही त्यांनी ओबीसी समाजाला न दुखवता मराठा समाजाला न्याय दिला. जातीच्या नावावर हिंदू समाजाला तोडण्याचे जे प्रयत्न सुरू होते, ते थांबविण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे, त्यामुळे त्यांचे आभार मानावे तेवढे थोडे असल्याचे मंत्री राणे म्हणाले.
महाराष्ट्राच्या इतिहासात जेव्हा जेव्हा मराठा समाजाला न्याय मिळाला, मराठा समाजाने गुलाल उधळला ते फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच सरकारच्या कार्यकाळात झाले आहे. 2014 ते 2019 च्या कालावधीत देेवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले आणि ते टिकून दाखविले. त्यानंतरच्या अडीच वर्षांच्या महायुती सरकारच्या काळातही 10 टक्के आरक्षण दिले, असा दावा त्यांनी केला.