

बांदा : सावंतवाडीतील प्रसिद्ध रील स्टार दीपक पाटकर ऊर्फ बेडूक भाई याचा मंगळवारी दुपारी मडुरा येथे रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी दु. 3.30 वा. मुंबईकडून मंगळूरकडे जाणार्या मंगला एक्स्प्रेस रेल्वेजवळ घडली. रेल्वेची जोरदार धडक बसल्याने दीपकचा जागीच मृत्यू झाला.
मंगला एक्स्प्रेसच्या चालकाने याची माहिती मडुरा रेल्वे स्टेशनला दिली. त्यानंतर मडुरा स्टेशनच्या अधिकार्यांनी सावंतवाडी रेल्वे स्टेशन तसेच बांदा पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधला. लगेचच पोलिस आणि रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेला.
दीपक पाटकर हा सावंतवाडी समाजमंदिर परिसरात राहत होता. तो काही वर्षांपासून छोट्या-मोठ्या कामांवर आपला उदरनिर्वाह करत होता. काही महिन्यांपूर्वी त्याने आपल्या इंस्टाग्रामवर ‘बेडूक भाई’ नावाने मजेशीर रील्स बनवायला सुरुवात केली होती. त्याचे व्हिडिओ लोकांना आवडू लागले आणि तो हळूहळू प्रसिद्ध झाला.
मंगळवारी दुपारी तो आपल्या बहिणीकडे, पाडलोस गावात जात असताना रेल्वे पटरी ओलांडत होता. त्याचवेळी मंगला एक्स्प्रेस गाडी आली आणि तो गाडीखाली सापडला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, तो त्या वेळी मोबाईल वापरत होता, त्यामुळे गाडी येत असल्याचे त्याला लक्षात आले नाही, असा अंदाज आहे.अपघाताची बातमी मिळताच त्याचे मित्र राजू धारपवार आणि इतर साथीदार घटनास्थळी पोहोचले. सावंतवाडी आणि बांदा भागात शोककळा पसरली. तो नेहमी हसत-खेळत वागायचा, सगळ्यांना मदत करायचा. कोणतेही काम सांगितले की लगेच करायचा, असे त्याच्या मित्रांनी सांगितले.
दीपकचा मृतदेह संध्याकाळी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला असून, बुधवारी सकाळी शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे, अशी माहिती बांदा पोलिसांनी दिली.