

कणकवली/वैभववाडी ः ठाकरे शिवसेनेचे वैभववाडी तालुकाप्रमुख आणि माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने वैभववाडी तालुकाप्रमुख पदी नंदू शिंदे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना ‘उबाठा’ मध्यवर्ती कार्यालयातून ठाकरे शिवसेनेचे सचिव, माजी खा. विनायक राऊत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली. तर, मंगेश लोके हे शनिवारी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
मंगेश लोके यांच्या भाजप प्रवेशामुळे वैभववाडी तालुक्यात ‘उबाठा’ पक्षाला मोठे खिंडार पडणार आहे. वैभववाडी तालुक्यामध्ये भाजपची मजबूज स्थिती असून उबाठा शिवसेनेचे बरेच कार्यकर्ते पक्ष सोडून भाजपात सामील होतं आहेत. लवकरच जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुका होणार असल्यामुळे पक्षीय राजकारणाला रंग आला आहे. भारतीय जनता पार्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गाव गाव पिंजून काढून पक्ष बळकट करण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. सध्याच्या परिस्थितीत भारतीय जनता पार्टी पक्षाला विरोधकच नसल्याचे दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी पंचायत समिती सदस्य आणि विद्यमान शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केल्याने त्यांची ठाकरे शिवसेना पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे. मंगेश लोके यांचा प्रवेश जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालय ओरोस येथे होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.