

ओरोस ः यावर्षी जिल्ह्यात मान्सूनचे आगमन तब्बल 15 दिवस लवकर म्हणजेच मे महिन्यात झाले. तत्पूर्वी, जिल्ह्यात 12 मेपासून मुसळधार मान्सूनपूर्व पाऊस झाला. तर 25 मे रोजी मान्सूनचे आगमन झाल्यानंतर पुढील पाच-सहा दिवस मान्सूनच्या जोरदार सरी कोसळल्या. आता गेले चार दिवसांपासून मान्सूनचा जोर कमी झाला आहे. मात्र, यावर्षी मे महिन्यात जिल्ह्यात सरासरी 540.5 मि.मी., तर आतापर्यंत (3 जून) पर्यंत सरासरी 771.4 मि.मी. पाऊस झाला आहे. दरम्यान, पावसाने विश्रांती घेतल्याने जिल्ह्यात भात पेरण्यांना सुरुवात झाली आहे.
मे महिन्यात तालुकानिहाय पाऊस (3 जूनपर्यंत) देवगड-579.5 मि.मी., मालवण-452.1 मि.मी., सावंतवाडी-664.6 मि.मी., वेंगुर्ले-668.4 मि.मी., कणकवली-586.5 मि.मी., कुडाळ-562.1 मि.मी., वैभववाडी-529.7 मि.मी., दोडामार्ग-494 मि.मी.
देवगड-48.9 मि.मी., मालवण-55.4 मि.मी., सावंतवाडी-48.1 मि.मी., वेंगुर्ले-80.8 मि.मी., कणकवली-47.7 मि.मी., कुडाळ-46.3 मि.मी., वैभववाडी-51.5 मि.मी., देवगड-45.5 मि.मी. असा दिवसभरात सरासरी 56.7 मि.मी. पाऊस पडला. यावर्षी मान्सून केरळमध्ये आठ दिवस अगोदर, तर महाराष्ट्रात बारा दिवस आधी दाखल झाला. तर मान्सूनने मुंबईत पोहोचण्याचा 117 वर्षांचा विक्रम मोडला. भारतीय हवामानतज्ज्ञ डॉ. देवरस यांच्या अंदाजानुसार, पाच जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. सध्या मान्सून मुंबई परिसरात अडकला आहे. हा खोळंबलेला मान्सून 10 जूननंतर पुन्हा सक्रिय होईल, त्यामुळे पेरणीसाठी शेतकर्यांनी घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. अरबी समुद्रात दक्षिण कोकण आणि गोव्याजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सून महाराष्ट्र आणि मुंबईपर्यंत वेगाने पोहोचला. शिवाय कोकण किनारपट्टी, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड पाऊस पडला. दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाने नदी, नाले प्रवाहीत झाल्याने जिल्ह्यात टंचाईची समस्या निकाली निघाली. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्येही सरासरी 50 टक्के पेक्षा पाणी साठा झाला आहे.
दरम्यान, 1 जून पासून मोसमी पावसाच्या प्रवासाची गती कमी झाली आहे. पश्चिम आशियावर तयार होणार्या जास्त दाबाच्या पट्टचाचा परिणाम भारताच्या मोसमी पावसाच्या गतीवर झाल्याचे मत इंग्लंड येथे कार्यरत भारतीय हवामान तज्ज्ञ डॉ. अक्षय देवरस यांनी व्यक्त केला.