

कुडाळ : कुडाळ शहरातील कुशल कारागीर सिद्धेश नाईक यांनी श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी तयार केलेला भव्य सागवानी रथ 5 नोव्हेंबर रोजी पूर्णत्वास नेऊन विठ्ठल-रखुमाई चरणी अर्पण केला. त्यांच्या या कल्पकतेने कुडाळचा राज्यभरात लौकिक झाला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा कुडाळ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-युवासेनेच्या वतीने सत्कार करून गौरव करण्यात आला.
सुमारे दीडशे वर्षे जुन्या सागवान वृक्षापासून बनवलेल्या या रथाची लांबी 15 फूट, रुंदी 6.5 फूट व उंची 15 फूट असून त्याचे एकूण वजन साधारण दोन टन आहे. हा रथ विठ्ठल मंदिर समितीचा पहिलाच सागवानी रथ असल्याचे विशेष. या रथाची रचना अत्यंत कलात्मक व पारंपरिक स्वरूपाची आहे. रथाच्या खांबांवर जय-विजय यांच्या मूर्तींची नक्षीकामासह सजावट केली असून वरच्या भागात गरुड व हनुमंत यांच्या मूर्ती कोरल्या आहेत. रथाला एकूण आठ खांब व तीन कळस असून संपूर्ण रथ नाजूक व देखण्या कोरीव कामाने समृद्ध आहे. यापूर्वीही सिद्धेश नाईक यांनी 2019 साली मुख्य गाभाऱ्यातील ‘ऋग्वेद’ वेदग्रंथाच्या लाकडी पेटीचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले होते.
कुडाळचे सुपुत्र म्हणून सिद्धेश नाईक यांनी केलेल्या या विशेष कामगिरीबद्दल त्यांचा ठाकरे शिवसेना व युवासेनातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट, सुशील चिंदरकर, नितीन सावंत व अमित राणे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. राज्यभरात सिद्धेश नाईक यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.