Pandharpur News: कार्तिकी यात्रेनिमित्त विठ्ठल- रुक्मिणीचे 24 तास दर्शन सुरू

भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजा व व्हीआयपी दर्शन बंद
Pandharpur News: कार्तिकी यात्रेनिमित्त विठ्ठल- रुक्मिणीचे 24 तास दर्शन सुरू
File Photo
Published on
Updated on

पंढरपूर : दरवर्षी कार्तिकी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त व दिवस पाहून श्री विठ्ठल-रुक्मिणीचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार रविवारी (दि. 26) विधिवत पूजा करून श्री विठ्ठल-रुक्मिणीचा पलंग काढण्यात आला. विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे. त्यामुळे श्री विठ्ठल- रुक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू राहणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणीचा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी राजोपचार बंद होऊन नित्यपूजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. दि. 9 नोव्हेंबर (प्रक्षाळपूजा) पर्यंत 24 तास दर्शन उपलब्ध असणार आहे. दर्शनरांगेत मोठ्या प्रमाणात भाविक आहेत. या भाविकांचे लवकरात लवकर दर्शन होण्यासाठी दर्शनरांग जलद व द्रुतगतीने चालविणेकामी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. परंपरेनुसार श्री विठ्ठल- रुक्मिणीचा पलंग काढण्यात आला आहे. त्यामुळे दैनंदिन 24 तास मुखदर्शन व 22.15 तास पदस्पर्शदर्शन भाविकांसाठी उपलब्ध झाले आहे.

याशिवाय, मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून व जागोजागी एलईडी टीव्हीद्वारे लाईव्ह दर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे. संपूर्ण यात्रा कालावधीत भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजा व व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. तसेच या यात्रा कालावधीतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या प्रथा व परंपरांचे कटाक्षपणे पालन करण्यात येत आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीचा पलंग काढणे, एकादशीच्या सर्व पूजा, महानैवेद्य, पादुकांची मिरवणूक, महाद्वार काला, प्रक्षाळपूजेचे योग्य ते नियोजन करण्यात आले आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणीचा पलंग काढताना पूजेवेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतलाताई नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), ॲड. माधवीताई निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्र. व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख संजय कोकीळ, अतुल बक्षी व पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news