Botanical Research | सिंधुदुर्गात दुर्मीळ वनस्पती सापडल्या; आंतरराष्ट्रीय स्तरावर दखलपात्र ठरल्या

जिल्ह्यात तीन दुर्मीळ वनस्पतींचा शोध,वैभववाडी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विजय पैठणे यांचे संशोधन; संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी; विनोद तावडेंकडून कौतुक
Botanical Research
भुईचाफा, रान तुळस, चिकट मत्स्याक्षी (Pudhari File Photo)
Published on
Updated on

वैभववाडी : आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. विजय पैठणे यांनी संशोधन करून भुईचाफा (kaemferia rotund) व गावठी तुळस ( रान तुळस ) Hyptis capitata Harley तसेच चिकट मत्स्याक्षी Staurognye glutinsosa wall या तीन दुर्मीळ वनस्पती सिंधुदुर्ग जिल्ह्यात असल्याचा शोध लावला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गसंपत्तीने समृद्ध आहे. आजवर येथे सुमारे 1150 ते 1200 हून अधिक वनस्पतींची नोंद झाली आहे. परंतु याच जिल्ह्यातून आणखी तीन दुर्मीळ वनस्पतींचा शोध नुकताच लावण्यात आला आहे. हे संशोधन केवळ सिंधुदुर्गच्या नव्हे, तर महाराष्ट्राच्या वनसंपदेसाठीही मोठे योगदान ठरणार आहे. वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. विजय पैठणे आणि त्यांचे विद्यार्थी 2015 पासून सिंधुदुर्गच्या वनसंपत्तीचा सखोल अभ्यास करीत आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या गावातील झाडांबद्दल अधिक जाणून घ्या, त्यांचे फोटो काढा, शास्त्रीय नावे शोधा, अशी प्रेरणा देत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आत्मियता आणि संशोधनाची रुची वाढते. या उपक्रमातूनच ही दुर्मीळ वनस्पती शोध मोहीम सुरू झाली.

संशोधनातील दुर्मिळ वनस्पती (भुईचाफा)

भारतामध्ये या प्रजातीच्या 8 प्रकार आढळतात. महाराष्ट्रात या वनस्पतीचा आधी फक्त पुणे परिसरात उल्लेख होता. परंतु F.Y.B.Sc. (Botany) ची विद्यार्थिनी सारिका विलास बाणे हिला कणकवली तालुक्यातील शिवडाव गावात ही दुर्मिळ वनस्पती आढळली. 25 वर्षांनंतर कोकणात या वनस्पतीचा पुन्हा शोध लागला आहे. या संशोधनाचा गौरव Applied Research in Life Sciences (जून 2025, अहमदाबाद) या आंतरराष्ट्रीय पुस्तकात करण्यात आला आहे.

Botanical Research
Sindhudurg : कासार्डे नळ योजनेची विहीर जमीनदोस्त

तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी योगेश्री केळकर हिने सोनाळी गावात Staurogyne glutinosa (Wall. ex C.B.Clarke) Kuntze (चिकट मत्स्याक्षी). ही वनस्पती शोधली. ओळख पटवण्यासाठी प्रा. पैठणे यांची मदत घेतली असता लक्षात आले की महाराष्ट्रात याआधी हिची नोंद नव्हती. भारतात या प्रजातीच्या 14 प्रकारांपैकी दोन फक्त महाराष्ट्रात होत्या. ही वनस्पती पूर्वी बिहार, केरळ, ओरिसा, उत्तर प्रदेश या राज्यांत होती. आता महाराष्ट्रातही हिची भर पडली आहे. हे संशोधन Journal of Economic Taxonomic Botany (सप्टेंबर 2024, राजस्थान) या नामांकित जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

Botanical Research
Sindhudurg Agriculture News | हिरि...री...पापारी...चा नाद विरला....!

कुडाळ तालुक्यातील हुमरमाळा गावातील डोनर या भागात प्रा. पैठणे यांच्या वनस्पती सर्वेक्षणात Hyptis capitata Harley (गाठी तुळस किंवा रान तुळस) ही वनस्पती आढळली. पूर्वी या वनस्पतीची नोंद फक्त अंदमान-निकोबार, केरळ, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि गोवा (मोलेम नॅशनल पार्क) येथे होती. महाराष्ट्राच्या वनसंपदेत या प्रजातीची ही पहिली नोंद ठरली आहे. हे संशोधन International Journal of Advance Research (एप्रिल 2024, इंदोर, मध्यप्रदेश) मध्ये प्रकाशित झाले आहे.

संस्थेचे कोषाध्यक्ष अर्जुन रावराणे, विश्वस्त गणपत दाजी रावराणे, शरद रावराणे, स्थानिक समितीचे सचिन प्रमोदजी रावराणे यांनी विद्यार्थिनी व प्राध्यापक यांचा महाविद्यालयात सत्कार व अभिनंदन केले.शोध हा थांबत नाही, तो पुढील पिढ्यांना दिशा देतो.सिंधुदुर्गसारख्या निसर्गसंपन्न जिल्ह्यात विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून वनसंपत्तीचा केलेला हा अभ्यास संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

जिल्ह्यातील निसर्गप्रेमी, अभ्यासक किंवा वनस्पतीविषयी अधिक जाणून घेऊ इच्छिणार्‍यांनी प्रा. विजय पैठणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे

  • ‘रान तुळस’ आणि’ चिकट मत्स्याक्षी’ या दोन वनस्पतींची महाराष्ट्रात प्रथमच नोंद.

  • ‘भुईचाफा’ या वनस्पतीचा तब्बल 25 वर्षांनंतर कोकणात पुनर्शोध.

  • संशोधनाला नामांकित आंतरराष्ट्रीय जर्नल्स आणि पुस्तकांमध्ये स्थान.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news