

मालवण : मालवण दांडी-झालझुलवाडी समुद्रकिनारी सोमवार, 11 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वा.च्या सुमारास एक दुर्मीळ ‘मास्कड बुबी’ पक्षी सापडला. समुद्राच्या लाटांमुळे किनार्यावर वाहत आलेल्या या पक्ष्याची अवस्था अत्यंत थकलेली होती. स्थानिक नागरिक आणि ‘युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेच्या तातडीच्या मदतीमुळे या पक्ष्याला जीवनदान मिळाले.
जान्हवी लोणे आणि दीक्षा लोणे या दुपारी समुद्रकिनारी फिरत असताना त्यांना लाटांमधून एक पक्षी किनार्याकडे वाहत येत असल्याचे दिसले. त्यांनी नारायण लोणे आणि भावेश लोणे यांना याबाबत सांगितले. जवळ जाऊन पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले की, तो पक्षी उडू शकत नव्हता. त्याची पंखे पूर्णपणे थकून गेली होती आणि तो असह्य अवस्थेत होता. जान्हवी लोणे यांनी त्वरित ‘युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेशी संपर्क साधला. संस्थेचे सदस्य अक्षय रेवंडकर, ‘ईकोमेट्स’चे सदस्य भार्गव खराडे यांनी घटनास्थळी धाव घेत पक्ष्याची पाहणी केली. तो एक दुर्मीळ ‘मास्कड बुबी’ (चरीज्ञशव इेेलू) प्रजातीचा पक्षी असल्याचे ओळखले. संस्थेचे सदस्य दर्शन वेंगुर्लेकर यांनी वन अधिकार्यांना ही माहिती दिली.
वन विभागाच्या कार्यवाहीची वाट न पाहता, ‘युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेच्या सदस्यांनी पक्ष्याला सुरक्षित ठेवण्यासाठी संस्था कार्यालयात उपाध्यक्ष स्वाती पारकर, ईकोमेट्सच्या सदस्य अनिता पारकर आणि मनीषा पारकर यांनी पिंजर्याची सोय केली. संध्याकाळी अक्षय आणि भार्गव यांनी या पक्ष्याला वन अधिकार्यांच्या ताब्यात दिले.
‘मास्कड बुबी’ हा पक्षी प्रामुख्याने उष्ण कटिबंधीय समुद्रात आणि प्रशांत महासागराच्या बेटांवर आढळतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा चेहरा एखाद्या मुखवट्यासारखा दिसतो, म्हणूनच त्याला हे नाव पडले आहे. हा शिकारी पक्षी असून तो समुद्रातील मासे आणि स्क्विडवर गुजराण करतो. साधारणपणे हा पक्षी भारतातील किनारपट्टीवर फारसा आढळत नाही, त्यामुळे मालवणमध्ये तो सापडणे ही एक दुर्मीळ घटना आहे. वादळ किंवा हवामानातील बदलांमुळे तो भरकटून या भागात आला असावा, असा अंदाज आहे.