

ओरोस : जिल्हा मुख्यालयासह धरण आणि रेल्वेसाठी सर्वाधिक जागा रानबांबुळी गावाचीच संपादित झाली आहे. त्यामुळे रानबांबुळी गावाचा सिंधुदुर्गनगरी नगरपंचायती मध्ये समावेश न करता स्वतंत्र गाव अबाधित ठेवावे, 77 हेक्टर क्षेत्रातील विकसित झोन वगळावा, रानबांबुळी गावाचा नगरपंचायतीत समावेश केरण्यास आमचा गावाचा ठाम विरोध आहे, असा ठराव रानबांबुळी ग्रामपंचायत ग्रामसभेने एकमताने घेतला आहे.
रानबांबुळी गावची ग्रामसभा सरपंच परशुराम परब यांच्या अध्यक्षतेखाली झाली.उपसरपंच अंजली कदम, ग्रामसेवक श्री. धुरी, ग्रा. पं. सदस्य वसंत बांबुळकर, काका परब, अशोक परब, प्रसाद गावडे, संजय लाड आदींसह गावातील दीडशेहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. या ग्रामसभेत गावातील विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली. पाणी योजना, रस्ते व दिवाबत्ती, वित्त आयोग अंतर्गत राष्ट्रीय पेयजल अंतर्गत विकास कामे यासह विविध विकासात्मक प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
त्यानंतर झालेल्या चर्चेत प्रस्तावीत सिंधुदुर्ग नगरी नगरपंचायत बाबत चर्चा करण्यात आली. ही नगरपंचायतील ओरोस, रानबांबुळी व अणाव या तीन गावांचा समावेश आहे. तसा करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मुळात जिल्हा मुख्यालय उभारण्यासाठी रानबांबूळी गावातील सर्वाधिक जमीन संपादीत झाली आहे. याशिवाय गावातील धरण, कोकण रेल्वे यासाठीही रानबांबुळी गावाची सर्वाधिक जमीन संपादित झाली आहे. त्यामुळे सिंंधुुदुर्गनगरी नगरपंचायत रानबांबुळी गाव वगळून करावी, अशी मागणी या सभेत करण्यात आली.
विविध शासकीय प्रकल्पांसाठी रानबांबुळी गावातील संपादीत जमिनीचा विचार करता प्राधिकरण क्षेत्रात परबवाडी मधील काही जमीन वगळण्यात यावी अशी आमची मागणी आहे. रानबांबुळी गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले गाव असून ग्रामपंचायत राहिल्यास या गावाचे नाव अबादीत राहील, अन्यथा सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीमध्ये रानबांबुळी गाव विलीन होऊन गावाचे नाव कायमचे पुसले जाईल, त्यामुळे रानबांबुळी गावाचा समावेश नगरपंचायतीत करण्यास आमचा पूर्ण गावाचा कडाडून विरोध आहे. वेळ पडल्यास आम्ही आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी या ग्रामसभेत दिला. रानबांबुळी गावाच्या चारही बाजुच्या सीमांवर ‘रानबांबुळी ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहे’ असे फलक लावण्याची सूचना काही ग्रामस्थांनी केली. ग्रामपंचायत असली तरी विकास निधी येणार आणि नगरपंचायत झाली तरी नगरोत्थान खाली निधी येणार. परंतु प्रॉपर्टी कार्ड आणि करवाढ या मुळे ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. तसेच लोकांना ग्रामपंचायत मधून जसे ताबडतोब दाखले मिळतात तसे दाखले व अन्य कागदपत्रे मिळविताना हेलपाटे मारावे लागतील, अशी भीती काही ग्रामस्थांनी व्यक्त केली.
सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय भूसंपादन प्रक्रियेनंतर वाढीव विकास झोन या नावाखाली गेली अनेक वर्षे 77 हेक्टर क्षेत्र राखीव दाखवले आहे. हे क्षेत्र रानबांबुळी गावाच्या क्षेत्रात दाखवून त्यावरील विकसित पारंपारिक निवासी वापर झोन या पेन्सिल नोंदी रद्द कराव्यात. याबाबत खा.नारायण राणे यांच्याकडे हा प्रस्ताव दिला असता खा. राणे यांनी त्यावेळी 60 हेक्टर क्षेत्र वगळण्याचा निर्णय घेतला. यामुळे आज धुरीवाडी सह गावातील अन्य काही वाड्यांचे क्षेत्र विकसित होत असल्याचे सांगण्यात आले.