

मळगांव : वेंगुर्लातील कलावलय संस्थेच्या 29 व्या प्रा. शशिकांत परनाळकर एकांकिका स्पर्धेत महाराष्ट्र व गोवा राज्यातील 20 एकांकीका सादर झाल्या. या स्पर्धेत कोल्हापूर येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या ‘ग्वाही’ या एकांकिकेने विजेतपद पटकाविले.
वेंगुर्लेतील मधुसुदन कालेलकर सभागृहात आयोजित या एकांकिका स्पर्धेला महाराष्ट्र व गोव्यामधील संघांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेत द्वितीय कलासक्त मुंबई संघाची ‘पेंडुलम’ तर तृतीय रंगवलय अंधेरीची ‘बार बार’ या एकांकिकेने मिळविला. उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी आयडियल इंग्लिश स्कूल, नेरुरची ‘देवराई’ व क्रिएशन कार्टी, मुंबईची ‘तळ्यात मळ्यात’ या एकांकिकांची निवड झाली. स्पर्धेचे परीक्षण मुंबई येथील श्रीनिवास नार्वेकर व प्रमोद लिमये यांनी केले. पारितोषिक वितरण नगराध्यक्ष दिलीप गिरप,कलावलयचे अध्यक्ष बाळू खामकर, सचिव संजय पुनाळेकर, सदस्य दिगंबर नाईक, परीक्षक श्रीनिवास नार्वेकर व प्रमोद लिमये यांच्या हस्ते झाले.
अभिनय ही जीवन जगण्याची कला आहे. जगण्यातला खरा आनंद नाटकातून घेता येतो. 40 मिनिटांच्या सादरीकरणातून एका सुंदर विषयाला वाहिलेली एकांकिका समाजातील विविध घडामोडींचे प्रतिबिंब उमटविते. समाज प्रबोधनही करते. विविध विषय एकाच मंचावर सादर होत असल्याने एकांकिका स्पर्धा हे वैचारिक प्रगल्भतेला चालना मिळणारे सर्वांत सक्षम साधन बनते. असे मत परीक्षक श्रीनिवास नार्वेकर यांनी व्यक्त केले. दुसरे परीक्षक प्रमोद लिमये यांनीही विचार मांडले. सूत्रसंचालन शशांक मराठे यांनी केले.