

Rajkot Shivaji Maharaj Statue
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे समुद्रकिनारी उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याच्या कामाला आता वेग आला आहे. येत्या २५ एप्रिलपर्यंत या पुतळ्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र दिनी होण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी या पुतळ्याच्या बांधकामावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. हा पुतळा अत्यंत भक्कमपणे उभारण्यात आला असून, ताशी २०० किलोमीटर वेगाने वारे वाहत असले तरी या पुतळ्याला कोणतीही हानी पोहोचणार नाही, असे मजबूत बांधकाम करण्यात आले आहे. जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली या पुतळ्याचे बांधकाम सुरू आहे. त्यांचे पुत्र अनिल सुतार हे प्रत्यक्ष बांधकामस्थळी भेट देऊन पाहणी करत आहेत, तर वयाची नुकतीच शंभरी वर्षे पूर्ण झालेले शिल्पकार राम सुतार यांनीही या पुतळ्याच्या जागेला भेट दिली आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी ४ डिसेंबर २०२२ रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र, २६ ऑगस्ट २०२४ रोजी हा पुतळा वादळामुळे कोसळला होता. आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवीन पुतळा उभारण्यात येत आहे. या पुतळ्यातील छत्रपतींच्या हातात असलेली तलवार २९ फूट लांब असून तिचे वजन २३०० किलोग्रॅम आहे.
सर्वसाधारणपणे मालवण राजकोट समुद्रकिनारी वाऱ्याचा वेग ४० ते ५० किलोमीटर प्रति तास असतो, जो जास्तीत जास्त १०० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. परंतु, उभारण्यात येत असलेला हा पुतळा ताशी २०० किलोमीटर वेगाने येणाऱ्या वाऱ्याचा सामना करण्यासाठी सक्षम आहे. यासाठी ऑस्ट्रेलियन विंटेक्स कंपनीच्या माध्यमातून पुतळ्याच्या चारही बाजूंनी वाऱ्याच्या वेगाची तपासणी करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन कंपनीने केलेल्या संगणकीय चाचणीत, पुतळ्याला एका गोलाकार जागेत ठेवून त्याला फिरवून ताशी २०० किलोमीटर वेगाने वारे सोडण्यात आले, तरीही पुतळ्याला कोणतीही इजा झाली नसल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे.
हा नवीन पुतळा ब्राँझ या धातूचा बनवण्यात आला आहे. यामध्ये ८८% तांबे, ८% कथील आणि ४% जस्त यांसारख्या धातूंचे मिश्रण आहे. या पुतळ्यासाठी २४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, राज्य शासनाने ३१ कोटी ७५ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे. शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात येत असलेल्या या पुतळ्याव्यतिरिक्त, त्यांनी गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्याचे कामही केले आहे. आणि अयोध्येतील श्रीरामांचा भव्य पुतळा उभारण्याचे कामही करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा उभारताना सर्व आवश्यक गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. हा पुतळा अत्यंत मजबूत आणि टिकाऊ असून तो १०० वर्षांहून अधिक काळ टिकेल, अशा प्रकारे काम केले जात आहे. आयआयटी मुंबईकडून या पुतळ्याचे डिझाइन तयार करण्यात आले आहे, अशी माहिती सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी दिली.