

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा: कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणातील संशयित आरोपी गणेश कृष्णा नार्वेकर, सर्वेश भास्कर केरकर या दोघांना पोलीस कोठडी अबाधित राखून न्यायालयीन कोठडी देण्यात आली. दरम्यान, या खून प्रकरणात वापरण्यात आलेली कार कुडाळ बाजारपेठ येथील इम्रान उस्मान शेख याची असून सिद्धेश शिरसाट यानेच ती भाड्याने घेतली होती. मात्र, इम्रान शेखला कशासाठी गाडी हवी ते सांगितले नव्हते. यासाठी भाडे म्हणून २ हजार २०० रू वाहनधारक इम्रान उस्मान शेख याला दिले होते. असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. (Prakash Bidwalkar Murder Case)
प्रकाश बिडवलकर खून प्रकरणातील चारही संशयितांची पोलीस कोठडी मंगळवारी संपली होती. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे अमोल शिरसाट व सिध्देश शिरसाट या दोघांना यापुर्वीच पोलीस कोठडी अबाधित राखून २४ एप्रिलपर्यन्त न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. तर उर्वरित संशयित आरोपी गणेश कृष्णा नार्वेकर व सर्वेश भास्कर केरकर या दोघांची पोलिस कोठडीची मुदत आज मंगळवारी संपली होती, त्यामुळे चार पैकी दोन्ही संशयित आरोपींना कुडाळ न्यायालयात आज (दि.१५) हजर केले असता २८ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, यातील पोलीस तपासात वेगवेगळे विषय समोर येत आहेत. यात प्रकाश बिडवलकर याचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी एकूण दोन गाड्यांचा वापर करण्यात आला होता. यातील एक कार पोलिसांनी सोमवारी जप्त केली आहे. ही कार कुडाळ बाजारपेठ येथील इम्रान ईस्मान शेख याची असल्याचे स्पष्ट झाले आहे. संशयित आरोपी क्रमांक एक सिद्धेश शिरसाट याच्याच सांगण्यावरून इम्रान शेख याने ही गाडी दिली होती. गाडी नेताना कशासाठी हे कारण सांगितले नव्हते. तसेच ही गाडी विना चालक या तत्वावर दिली होती. त्यामुळे या गाडीचा वापर सिध्देशने कशासाठी केला ? याची इम्रान शेख यांना कोणतीच कल्पना शेवटपर्यंत दिली नाही. यासाठी २ हजार २०० रूपये भाडे इम्रान शेख यांना दिले होते. दरम्यान यातील दुसऱ्या गाडीचा शोध पोलीस घेत आहेत.
या खून प्रकरणाचा सर्वच तपास चारच संशयितांभोवती घुटमळला आहे. यामध्ये पोलिसांनी यात अजून आरोपी असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या प्रकरणातील आरोपी सिद्धेश शिरसाठ याच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू होते. त्याला आजच डिस्चार्ज मिळाला असून त्याला सावंतवाडी येथील कारागृहात हलविण्यात येणार आहे. तसेच सिध्देश शिरसाटचा मोबाईल अद्याप प्राप्त झालेला नसल्याची माहिती तपासी अधिकारी भीमसेन गायकवाड यांनी सांगितले.