

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील चेंदवण नाईकवाडी येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर याच्या खून प्रकरणातील संशयित सिद्धेश शिरसाट ,गणेश नार्वेकर,सर्वेश केतकर व अमोल शिरसाट या चारही जणांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी एकूण दोन भाड्याच्या गाड्यांचा वापर केला होता. या घटनेत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात अजूनही काही संशयितांचा हात असण्याची शक्यता आहे. यात वापरलेल्या दोन्ही गाड्या व साहित्य ताब्यात घेणे व इतर संशयितांची माहिती घेण्यासाठी न्यायालयाकडे वाढीव पोलिस कोठडी देण्याची मागणी आम्ही करणार असल्याची माहिती तपासी अधिकारी तथा सहायक पोलिस उपनिरीक्षक भीमसेन गायकवाड व कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली आहे.
चेंदवण येथील प्रकाश बिडवलकर खून प्रकरणात आता वेगवेगळे विषय समोर येत आहेत. त्यामुळे पोलीसांनी आता आपला तपास वेगवेगळ्या सुत्रांनुसार सुरू केला आहे. यातील महत्त्वाचा मुद्दा असलेला मृतदेहाची विल्हेवाट कोणी कोणी व कशा प्रकारे लावली. याबाबत अधिकाधिक माहिती मिळवण्यात पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. प्रकाश बिडवलकर याला अपहरण करून मारल्यानंतर संशयित आरोपींनी आपली गाडी न वापरता त्याचा मृतदेह अन्यत्र हलवण्यासाठी भाड्याच्या गाड्यांचा वापर केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर कोणालाही आपल्यावर संशय येऊ नये यासाठी त्यांनी भाड्याच्या गाड्या बोलावल्या. यामध्ये दोन गाड्यां असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे. पोलीस या दोन्ही गाड्या लवकरच ताब्यात घेणार तसेच प्रकाश बिडवलकर याला मारण्यासाठी अन्य काही साहित्य वापरले होते का? ते साहित्यही पोलीसांना ताब्यात घेण्याचे आहे. सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा येथे असलेली स्मशानभूमी ही डोंगराळ भागात असल्याने त्या ठिकाणी मृतदेह नेणे थोडे कठीण होते. त्यामुळे यामध्ये अन्य कोणाचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने ही तपास सुरू केला आहे.
या खून प्रकरणाच्या तपासाला जशी गती येत आहे तसतसे यामध्ये अनेक नवीन नवीन मुद्दे आहेत. या प्रकरणाच्या मुळाशी एक वेगळी किनार असल्याचे बोलले जात आहे. पोलीस प्रशासनाच्या दृष्टीने दोन वर्षानंतर हा गुन्हा उघड होऊन संशयित मिळणे जरी महत्त्वाचे असले तरी हा गुन्हा उघड होण्याचा घटनाक्रम हा एका विशिष्ट हेतूने केला आहे का? याबाबत उलटसुलट चर्चा आहे. . त्यामुळे पोलीस तपासात समोर येत असलेले नवनवीन मुद्दे विचारात घेता या तपासाला पुरेसा अवधी मिळावा यासाठी पोलीस न्यायालयाकडून रविवारी या संशयित आरोपींसाठी अजून पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत. अशी माहिती तपासी अधिकारी निवती पोलीस दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमसेन गायकवाड व कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली आहे.
कुडाळ तालुक्यातील चेंदवण नाईकवाडी येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर याच्या खून प्रकरणातील संशयित सिद्धेश शिरसाट ,गणेश नार्वेकर,सर्वेश केतकर व अमोल शिरसाट या चारही जणांची उद्या रविवारी पोलीस कोठडीची मुदत संपत आहे. त्यामुळे चारही संशयितांना रविवारी कुडाळ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.