

बांदा : आठ महिन्यांच्या बाळाला सोडून बेपत्ता झालेल्या पूजा चौहान यांचा दहा दिवस उलटूनही अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. पोलिसांची दोन स्वतंत्र पथके विविध ठिकाणी रवाना करून शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, संबंधित महिलेचा कोणताही मागमूस न लागल्याने दोन्ही पथके रिकाम्या हाताने परतली असून, या प्रकरणाबाबत परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
सदर महिला ज्या कुटुंबाकडे वास्तव्यास होती, त्यांच्याकडे तिची कोणतीही ओळख पटविणारी कागदपत्रे नसल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे तपासात आणखी अडचणी निर्माण झाल्या असून, कोणतीही खातरजमा न करता संबंधित महिलेला घरात कसे ठेवण्यात आले, याबाबतही विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पूजा चौहान या २१ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास आपल्या आठ महिन्यांच्या बाळाला तेथेच सोडून अचानक निघून गेल्या. त्यानंतर ज्या कुटुंबाकडे त्या राहत होत्या. त्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्या कुठेही आढळून न आल्याने याबाबत बांदा पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
आई बेपत्ता झाल्यानंतर आठ महिन्यांच्या बाळाला बांदा पोलिसांनी बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले. त्यानंतर चार दिवस बाळाला बाल रुग्णालयात वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. पुढील देखभालीसाठी त्याला चिपळूण येथील बालसंगोपन संस्थेकडे सोपविण्यात आले आहे.
तपासादरम्यान महत्त्वाचा अडथळा म्हणजे महिला बेपत्ता झालेल्या दिवशी मंगळवार असल्याने वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते आणि महत्त्वाचे फुटेज उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे तपासात अडचणी येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, पूजा चौहान यांच्याबाबत अथवा त्यांच्या हालचालींबाबत कोणाकडेही कोणतीही माहिती असल्यास ती बिनधास्तपणे बांदा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून द्यावी, असे आवाहन बांदा पोलिसांनी केले आहे.