

नितीन सावंत
कणकवली :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दारू, मटका, जुगार, चरस, गांजा अशा अवैध धंद्याविरोधात सिंधुदुर्ग पोलिसांकडून विशेष पथक तयार करण्यात आले आहे. पोलिस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी व 6 पोलिसांचा या पथकात समावेश करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहीकर व अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक 28 नोव्हेंबरपासून जिल्ह्यात कार्यरत झाले आहे.
आठवडाभरात या पथकाने धडक कारवाया जिल्ह्याच्या विविध भागांत सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील असे अवैध व्यवसाय समूळ नष्ट करण्याचे या पथकाचे लक्ष असल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहेत. सिंधुदुर्गात गेल्या काही कालावधीत अवैध व्यवसाय बिनबोभाट सुरू असल्याने त्याविषयी विविध स्तरावर जोरदार चर्चा होत होत्या. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व स्थानिक पोलिसांकडून अशा व्यवसायांवर कारवाई केल्या जात होत्या.
मात्र त्यानंतरही अनेक ठिकाणी बिनदिक्कतपणे असे व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास येत होते. काही महिन्यांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथे एका मटका अड्ड्यावर स्वत: धाड टाकल्याने सिंधुदुर्गातील असे व्यवसाय प्रकाशझोतात आले होते. त्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोपही झाले होते. या रेडनंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी जिल्ह्यातील अनेक भागात छापे टाकून आपल्या कारवाया वाढविल्या होत्या.
सिंधुदुर्गातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागातील उपनिरीक्षक आर. बी. शेळके यांच्यासह सातजणांचा या पथकात समावेश करण्यात आला आहे. सिंधुदुर्गातून अवैध व्यवसायांना समूळ नष्ट करणे हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून हे पथक तैनात करण्यात आले आहे. गेल्या आठवडाभरात या पथकाने दोडामार्ग, बांदा, आचरा, मालवण, कणकवली आदी भागात धडक कारवाई सुरू केली आहे.
सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी गोवा बनावटीची दारू राजरोसपणे विकण्याचे प्रकार सुरू आहेत. अशा दारूच्या सेवनाने अनेक तरूणांनी प्राणही गमावले आहेत. अशा दारू वाहतूक व विक्रीला आळा घालतानाच जुगार, मटका यावरही या पथकाचे लक्ष असणार आहे. सिंधुदुर्गातील अनेक तरूण चरस गांजाच्या आहारी गेल्याचे निदर्शनास येत असल्याने त्यावरही या पथकाची करडी नजर असणार आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण व स्थानिक पोलिसांबरोबरच आता जिल्ह्यातील अवैध व्यवसाय हे या विशेष पथकाच्या निशाण्यावर असणार आहेत.