

कणकवली : अजित सावंत सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सह्याद्रीचा परिसर हा जागतिक स्तरावर महत्त्वाचा पश्चिम घाट जैवविविधता क्षेत्राचा भाग आहे. सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकण पट्टयात अलिकडच्या काळात वन्यजीवांची शिकार, फास लावणे आणि वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या अवैध तस्करीच्या घटनांमध्ये चिंतनीय अशी वाढ झाली आहे. बिबट्याचे नख, दात, कातडी यांना काळ्या बाजारात असलेली मागणी यामुळे अवयव तस्करी होते तर रानडुक्कर, सांबर, भेकर यांची मांसासाठी बेकायदेशीर शिकार केली जाते.
नुकतीच कुडाळ येथे एका सराफ दुकानावर वनविभागाच्या पथकाने छापा टाकून बिबट्याच्या नखांसह अनेक प्राण्यांचे अवयव जप्त केले. तर गेल्या महिन्यातच आंबोलीच्या राखीव जंगलात वन विभागाने धडक मोहीम राबवून शिकाऱ्यांच्या आठ जणांच्या आंतरजिल्हा टोळीला जेरबंद केले होते. या घटनांवरून वन्यजीवांच्या शिकार आणि तस्करीचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सिंधुदुर्गसह कोकण प्रदेश हा जैवविविधतेने समृध्द असा प्रदेश आहे. या जंगलात बिबट्या, पटेरी वाघ, रानडुक्कर, सांबर, भेकर, शेकरू, साळींदर, खवले मांजर, पिसई, रानकुत्रे ससा यासारख्या वन्यजीवांचा मोठा अधिवास आहे. हे वन्यप्राणी पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार वन्यप्राण्यांची शिकार करणे, त्यांचे अवयश बाळगणे, विक्री करणे किंवा व्यापार करणे हा गंभीर गुन्हा असून याप्रकरणी दोषी आढळल्यास सात वर्षाच्या दंडाची शिक्षा आहे. असे असुनही शिकारीच्या आणि तस्करीच्या घटनांना फारसा आळा बसताना दिसत नाही. शिकारीबरोबरच जंगलालगतच्या गावांमध्ये वायरचे फास आणि विद्युत प्रवाह सोडून वन्यप्राण्यांच्या शिकारी केल्या जातात. दरवर्षी सिंधुदुर्गात शिकारीच्या पाच-सहा घटना तर तस्करीच्या दोन-तीन घटना तरी उघडकीस येतात. न उघडकीस येणाऱ्या शिकारी आणि तस्करींची संख्याही निश्चितच मोठी आहे. नोव्हेंबर, डिसेंबर दरम्यान फोंडाघाट, करूळ परिसरात कारवाई करून बिबट्याचे नख व दात विक्रीसाठी आणलेल्या टोळीचा पर्दापाश वनविभागाने केला होता.
तर दोन वर्षापूर्वी खवले मांजरांच्या तस्करीची घटनाही उघडकीस आली होती. तसेच अलिकडेच वन विभागाने कुडाळ येथे एका सराफ दुकानावर छापा टाकून बिबट्या व वन्यजीवांचे अवयव जप्त केले. यावरून कोकणातही शिकारीबरोबरच वन्यजीवांच्या अवयवांच्या अवैध वापराचे जाळे सक्रीय असल्याचे स्पष्ट होते. सिंधुदुर्गात गेल्या काही वर्षात बिबट्यांची संख्या लक्षणीय अशी वाढली असून २०२४ मध्ये कॅमेरा ट्रॅप अभ्यासात सिंधुदुर्ग, सातारा हा पट्टा केवळ वाघांचा कॉरीडॉर नसून पट्टेरी वाघांचा प्रत्यक्ष अधिवास असल्याचे समोर आले होते.
आंबोलीच्या जंगलात तर काही वर्षापूर्वी ब्लॅक पँथर दिसून आला होता. त्यामुळेच या भागातील शिकारींचे प्रकार अधिक गंभीर ठरतात. सिंधुदुर्गात तर गेल्या काही वर्षात फासकीत अडकून बिबट्यांना मारल्याच्या घटनाही उघडकीस आल्या होत्या. तसेच खवले मांजराच्या शिकारींचे प्रमाणही अधिक असून या प्राण्याला आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारात मोठी मागणी असल्याने या वन्यप्राण्याचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. या वाढत्या शिकारींमुळे जंगलातील अन्नसाखळी विस्कळीत होण्याचा धोका आहे. बिबट्या आणि वाघांसारख्या भक्षकांची संख्या कमी झाल्यास रानडुक्कर, सांबर यांची संख्या वाढून शेतीचे नुकसान वाढू शकते, नव्हे ते वाढलेच आहे. शिवाय जैवविविधतेला धोका उद्भवतो. त्यामुळे या शिकारीला आणि तस्करीला आळा घालण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर आहे. अर्थात ज्या प्रमाणात वनविभागाकडे कर्मचाऱ्यांची संख्या हवी ती पुरेशी नाही. विस्तीर्ण जंगल आणि कमी कर्मचारी, डोंगराळ, दुर्गम भूप्रदेश यामुळे रात्री गस्त घालण्यात अडचणी येतात.
शिवाय राज्याच्या सीमेलगत गोवा आणि कर्नाटकाकडे जाण्याचे मार्ग असल्याने शिकाऱ्यांना आपले लक्ष्य साध्य करणे शक्य होते. तरीही वनविभागाने वेळोवेळी शिकारीच्या घटना आणि तस्करीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. शिकारींना आळा घालण्यासाठी जंगलात नियमित आणि तंत्रज्ञान आधारीत गस्त महत्वाची आहे.
ड्रोन, कॅमेरा ट्रॅप आणि गुप्त माहिती यंत्रणा अधिक बळकट करण्याची गरज आहे. तसेच गावकऱ्यांचा सहभाग वाढवून वन्यजीव संरक्षण समित्या सक्रीय करणे आवश्यक आहे. शिकारीच्या गुन्ह्यांमध्ये जलद तपास व कठोर शिक्षा झाल्यास अशा गुन्हेगारांना कायद्याचा धाक वाटेल. तसेच जनजागृती आणि वन्यजीव संरक्षणाबाबत सातत्याने अभियान राबविण्याची गरज आहे. तरच वन्यप्राण्यांच्या वाढत्या शिकारीला आणि अवयवांच्या तस्करीला रोखता येणे शक्य आहे.