

सावंतवाडीः नागेश पाटील
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे, मटका, जुगार, गोवा बनावटीची दारू, ड्रग्स, बीफ वाहतुकीवरून रविवारी पालकमंत्री नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्ह्यातून हे सर्व धंदे हद्दपार केले जातील असा इशारा दिला. त्यांच्या या इशाऱ्यांमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत, तर पोलिस प्रशासनाने देखील धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांची गोवा हद्दीकडे करडी नजर असून त्यामुळे गुन्हेगारांची पळापळ सुरू झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा गेल्या काही वर्षांत अवैध धंद्याचे कुरण बनला आहे. हा जिल्हा गोव्याच्या शेजारीच लागून असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गोव्यातून अवैध धंदे चालतात. रविवारी सावंतवाडी दौऱ्यावर आलेले पालकमंत्री नितेश राणे यांनी याच अवैध धंद्यांवरून एकच एल्गार करत जिल्ह्यातून हे धंदे कायमचे हद्दपार करणार असल्याचे जाहीर केले आहे. ज्या प्रमाणे देशातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन होत आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून देखील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार पालकमंत्री राणे यांनी केला.
सध्या जिल्ह्यात गोवा बनावटीची दारू वाहतूक, मटका जुगार, तीन पत्ती जुगार, ड्रग्ज व बीफ वाहतूक अशा प्रकाराचे मोठे अवैध धंदे जिल्ह्यात राजरोसपणे सुरू आहेत. त्यावर ना राणे यांनी आक्रमक भूमिका घेताना माझ्या जिल्ह्यात हे असले प्रकार चालणार नाहीत, गुन्हेगार कोणीही असो, पक्ष-जात-पात झेंडा धर्म न पाहता कडक कारवाई केली जाईल. गुन्हा करणारा व्यक्ती कोणत्याही विचारसरणीचा असो तो केवळ एक गुन्हेगार असतो. त्यामुळे त्याच्याकडे गुन्हेगार याच नजरेने पाहिले जाईल, जोपर्यंत हा जिल्हा अवैध धंदे मुक्त होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, तर कुठल्याही टोकाला जाण्याची माझी तयारी आहे असा दम पालकमंत्री राणेंनी दिला होता. यामुळे जिल्ह्यातील अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्यात हे धंदे आणणारे व्यापार करणारे व साखळी पद्धतीने त्याचे जाळे पसरवणारे या सर्वांवर आपली नजर असून त्यापैकी एका मुख्य सूत्रधाराला ताब्यात घेतले आहे. त्यातून अनेक धागेदोरे हाती लागतील. त्यानुसार येणाऱ्या काही महिन्यांमध्ये कारवाई केली जाईल असेही राणेंनी सांगितले होते. यामुळे अवैध धंदे व्यावसायिक चांगलेच अडचणीत आले आहेत. हा जिल्हा गुन्हेगारी, गोवा बनावटीची दारू, ड्रग्ज जुगार, मटका मुक्त होईल असा विश्वास पालकमंत्री यांनी व्यक्त केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा गोवा राज्याला लागूनच असल्याने तेथील अवैध वेश्या, देह व्यापार, चरस, गांजा, बीफ सारखे धंदे व त्यांचे लोण वेगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पसरत आहेत. या धंद्यात युवा पिढी मोठ्या प्रमाणावर गुंतली असून ड्रग्स आणि बीफ वाहतूक सध्या मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात होत आहे. आता जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी गांजा सहज उपलब्ध होत असून त्याचे किरकोळ विक्रेते गल्लोगल्ली तयार झाले आहेत. या सर्वांवर पोलिस प्रशासन करडी नजर ठेवून आहे. गोवा बनावटीच्या दारूवर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे. गेल्या आठवडाभरात ३० लाखांहून अधिकचा माल पकडला गेला आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथे मटका बुकीवर धडक कारवाई केली होती त्यामुळे जिल्ह्यात काही महिने मटका जुगार पूर्णपणे बंद होता. आता पुन्हा मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने मटका खेळला जातो. बहुतांशी शहरात टपऱ्या उभ्या करून त्यात मटका घेतला जातो. मात्र पोलिस प्रशासन म्हणावी तशी दखल घेत नाहीत. मागील एका महिन्यात मटका, गांजा, ड्रग्स यावर पोलिसांनी कित्येक कारवाया केल्या आहेत. आता पुन्हा पालकमंत्री यांनी आपला मोर्चा अवैध धंद्याकडे वळवला असल्याने आता मुख्य सूत्रधार आणि पुरवठा करणारे चांगलेच अडचणीत आले आहेत.