

कुडाळ : पिंगुळी-गुढीपूर येथील हॉटेल वेलकम नजीक किरकोळ विषयावरून झालेल्या बाचाबाची वरून स्थानिक व परजिल्ह्यातील तरुण अशा दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी 7.15 वा.च्या सुमारास घडली. यात फावडे, दांडा व हाताच्या थापटाने मारहाण तसेच शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील तरुणाने स्थानिक पंकज रवींद्र मसगे (32, रा. पिंगुळी-गुढीपूर) या तरुणावर फावडा मारून खुनी हल्ला केला. यामध्ये हा तरुण गंभीर जखमी असून त्याला अधिक उपचारासाठी गोवा येथे हलवण्यात आले आहे.
याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आला असून एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पर जिल्ह्यातील युवकाने स्थानिकाला मारहाण केल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले. कुडाळ पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. या परप्रांतीय तरुणांना आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली. ग्रामस्थांनी कुडाळ ग्रामीण रुग्णालयाबाहेरही गर्दी केली होती. अखेर पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयाचा दरवाजा बंद करून घेतला. याबाबत उमेश दत्ताराम गंगावणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उमेश गंगावणे व त्यांचा मित्र पंकज रणशूर हे मोटारसायकलने शनिवारी रात्री 8 वा. घरी जात होते. यावेळी महामार्गाच्या सर्विस रोडवर मयेकर दुकानाजवळ तिघेजण रस्त्याच्या मधून चालत होते.
उमेश गंगावणे यांनी मोटारसायकल त्यांच्याजवळ थांबवून रस्त्याच्या मधून चालू नका, असे सांगितले. यावेळी त्यातील एकाने उमेश गंगावणे यांना शिवीगाळ केली. यावर उमेश त्यांनी आपल्याला शिवीगाळ करू नका असे सांगितले असता त्या तिघांनी शिवीगाळ करत उमेश व पंकज यांना ते राहत असलेल्या रूम जवळ बोलून घेतले. हे दोघेही त्या रूम जवळ गेल्यावर त्यांना रूममध्ये खेचून घेत रूमचा मुख्य दरवाजा लावत दांडा घेऊन पंकज याच्या उजव्या पायावर व उजव्या हातावर मारला. या दोघांनाही दांड्याने झाडूने मारहाण करण्यास सुरुवात केली.
ही झटापट सुरू असताना उमेश गंगावणे यांनी फोन करून आपल्या वाडीतील लोकांना ही माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच वाडीतील लोक तेथे आले. मात्र त्यांना दरवाजा उघडत नसल्याने एकाने खिडकीची काच फोडली. यावेळी मारहाण करत असलेल्या व्यक्तीने फोडलेली ही खिडकीची काच घेऊन मारलेली काच पंकज याच्या पोटाला लागली. तर बनियन घातलेली एक व्यक्ती फावडे घेऊन पंकज व उमेश यांच्या दिशेने येत दरवाजासमोर उभा राहिला. वाडीतील लोकांनी दरवाजा जोरात ढकलून तो उघडला. यावेळी आत सोडवण्यासाठी आलेल्या लोकांपैकी पंकज मजगे यांच्या डोक्यावर त्या इसमाने ते फावडे मारले.
आत आलेल्या लोकांनी पंकज रणसूर व उमेश गंगावणे यांना सोडवण्याचा प्रयत्न करत असताना दीपक गंगावणे यांच्या डोक्यावरही या फावड्याचा दांडा मारून दुखापत केली. जखमी दोघांनाही नागरिकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. दरम्यान पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी मारहाण करणार्या व्यक्तींपैकी यश मिलिंद ऐनापुर, अमरीश इराप्पा रायनवर व सादिक गुलाम मुल्ला (सर्व रा. जत सांगली) यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी या तिघांवर एकावर खुनी हल्ला तसेच शिवीगाळ व मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यश मिलिंद ऐनापुरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रस्त्यावर आपल्यामध्ये झालेल्या शिल्लक बाचाबाचीचा राग मनात धरून गंगावणे, मसगे व रणसूर हे तिघे आपल्या खोली जवळ आले. त्यांनी आपल्याला हाताच्या थापटाने व झाडूने मारहाण केली. आपल्यासोबत असलेल्या अमरीश इराप्पा व सादिक मुल्ला यांनाही मारून दुखापत केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस ममता जाधव करत आहेत, अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.
या प्रकरणी दोन्ही गटातील एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी यश मिलिंद ऐनापुर, अमरीश इराप्पा रायनवर या दोघांना कुडाळ पोलीसानी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पंकज रवींद्र मसगे (32, रा. पिंगुळी गुढीपूर) हा तरुण गंभीर जखमी असून त्याला कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा बाबोळी येथे येथे हलवण्यात आले आहे.