

कुडाळ : पिंगुळी-पाट मुख्य रस्त्यावर पिंगुळी- भूपकरवाडी येथे उभ्या कारला पाट मोटारसायकलने जोराची धडक दिल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली होती. यात मोटारसायकलच्या मागे बसलेला जयेश गोविंद नाईक (20, रा. माणगाव-डोबेवाडी) हा गंभीर जखमी झाला होता.
कुडाळात ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी बांबोळी-गोवा येथे हलविले होते. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी रात्री उशिरा त्याचे निधन झाले. या अपघातात मोटारसायकलस्वार संकेत श्रावण धुरी (20, रा. माणगांव-बेनवाडी ) हा सुद्धा जखमी झाला असून त्याच्यावर सिंधुदुर्गनगरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जयेश व संकेत हे पाट येथील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा पाहून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. याबाबतची फिर्याद कारमालक गोविंद दाजी बावलेकर (रा.पिंगुळी - गुढीपूर) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली.
गोविंद बावलेकर हे पिंगुळी-भूपकरवाडी येथे भाड्याने राहतात.त्यांनी आपली कार पिंगुळी-पाट रस्त्याच्या बाजूला पार्क केली होती. संकेत धुरी व जयेश नाईक रविवारी सायंकाळी मोटारसायकलने पाट येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी गेले होते. मध्यरात्री 2 वा.च्या सुमारास ते दोघे मोटारसायकलने परत माणगाव येथे घरी परतत होते.
संकेत धुरी मोटारसायकल चालवित होता. त्याचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले आणि मोटरसायकल भूपकरवाडी येथे रस्त्याच्या बाजूला उभ्या कारला धडकली. या धडकेत मोटारसायकलच्या मागे बसलेला जयेश नाईक कारच्या बोनेटवर आदळून नंतर जमिनीवर कोसळला. यात तो गंभीर जखमी झाला, तर संकेत यालाही दुखापत झाली.
दोघांवरही प्रथम कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, गंभीर जखमी जयेश याला अधिक उपचारासाठी बांबोळी-गोवा येथे हलविण्यात आले होते. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी रात्री उशिरा त्याचे निधन झाले. संकेत याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात कार व मोटारसायकल या दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.
अती वेगाने, हयगयीने निष्काळजीपणाने, बेदरकारपणे मोटारसायकल चालवून स्वतःच्या दुखापतीला व जयेश याच्या मृत्यूला तसेच दोन्ही वाहनांचे नुकसानीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी संकेत याच्यावर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.