

मडुरा : सावंतवाडी तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामातील भात लावणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विशेषतः पाडलोस, न्हावेली, मडुरा, रोणापाल, सातोसे, निगुडे, कास, शेर्ले, बांदा, वाफोली आणि विलवडे या भागांमध्ये भात लावणीची लगबग सुरू असून, अनेक ठिकाणी कामे पूर्णत्वास आली आहेत.
यंदा पावसाने चांगली हजेरी लावल्याने पाण्याची मुबलकता आहे. ज्यामुळे भात लागवडीसाठी आवश्यक असलेली पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याने शेतीची कामे अधिक वेगाने पूर्ण करण्यास मदत झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी आणि चिखलणीची कामे करत आहेत. ज्यामुळे वेळेची बचत होऊन कामे लवकर आटोपत आहेत.
यावर्षी शेतकर्यांनी विविध प्रकारच्या भाताच्या जातींच्या बियाण्यांची लागवड केली आहे. ज्यामुळे उत्पादनात वाढ होण्याची आणि चांगला नफा मिळण्याची अपेक्षा आहे.
गेले दोन दिवस तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतांमध्ये पुरेसे पाणी टिकून राहिले आहे, जे भात पिकाच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. शेतकर्यांनी घेतलेल्या कष्टाला चांगले फळ मिळेल अशी आशा शेतकर्यांतून व्यक्त होत आहे. एकूणच, अनुकूल हवामान आणि शेतीमधील आधुनिक पद्धतींचा अवलंब यामुळे सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील भातशेतीचा हंगाम यशस्वी होणार असल्याचे शेतकर्यांनी सांगितले.