

कणकवली : ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली कणकवली येथील एका डॉक्टरची तब्बल 7 लाख 3 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. त्या डॉक्टरांकडून याची कणकवली पोलिसात तक्रार दिली आहे.
त्या डॉक्टरांना 4 जुलै 2025 रोजी एका मोबाईल नंबर वरून ‘प्रिया देसाई’ नावाच्या महिलेचा व्हॉटस्अॅप मेसेज आला. तिने स्वतःला एका कंपनीतील सहायक असल्याचे सांगून शेअर मार्केटमध्ये प्रिमियम स्टॉक खरेदीबाबत चौकशी करण्यास सांगितले. प्रिया देसाईने त्या डॉक्टरना एका व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये अॅड केले आणि विविध कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्यास सुचवले. सुरुवातीला नफा झाल्याने डॉक्टरांचा तिच्यावर विश्वास बसला. त्यानंतर तिने एक अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगून ‘इन्स्टिट्युशनल स्टॉक’ मध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
त्या डॉक्टरानी दोन बँकेच्या खात्यांतून 7 लाख 3 हजार रुपये विविध खात्यांवर ऑनलाईन ट्रान्सफर केले. त्या अॅपमध्ये त्यांना 12 लाख 31 हजार 776 रुपये नफा दाखवला गेला. मात्र, ती रक्कम काढता येत नव्हती. त्याबाबत विचारणा केली असता प्रिया देसाईने डॉक्टरांना उडवाउडवीची उत्तरे दिली आणि नंतर संपर्क तोडला.
ही फसवणूक लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी 16 ऑगस्ट रोजी ऑनलाईन तक्रार नोंदवली आणि 19 सप्टेंबर रोजी कणकवली पोलिसात रितसर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.