

विराज परब
बांदा : सिंधुदुर्ग-गोवा सीमाभागात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा ‘ओंकार’ हा टस्कर हत्ती आता बांदा परिसरातील मडुरा गावात दाखल झाला आहे. त्याच्या उपस्थितीने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेले तीन दिवस कास गावात ठाण मांडून बसलेला हा हत्ती सोमवारी सकाळी मडुरा गावात प्रवेश करताच नागरिकांमध्ये खळबळ उडाली.
परबवाडी परिसरातील अनेक शेतकर्यांच्या भातशेतीत हत्तीने मोठ्या प्रमाणात हानी केली असून काही ठिकाणी पिके पूर्णपणे चिरडून टाकली आहेत. सायंकाळच्या सत्रात ओंकारने मडुरा-सातार्डा रस्त्यावर सुमारे तासभर ठिय्या मांडल्याने वाहतूक ठप्प झाली. हत्तीला पाहण्यासाठी आसपासच्या गावांतून नागरिक मोठ्या संख्येने जमले होते, मात्र त्याच्या आक्रमक स्वभावामुळे वनविभागाची प्रचंड दमछाक झाली. सध्या हा हत्ती कोकण रेल्वे रुळांच्या 100 मीटर परिसरात वावरत असून, तो रेल्वे मार्गावर न येण्यासाठी वनविभागाचे पथक दिवस-रात्र तैनात आहे.
मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी वनविभागाच्या निष्क्रिय भूमिकेबाबत तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी सांगितले, हत्ती पकड मोहिमेचे आश्वासन हवेत विरले आहे. दोन-तीन दिवसांत कारवाई करू असे सांगण्यात आले, पण प्रत्यक्षात काहीच झाले नाही. नागरिक दिवसेंदिवस भीतीत जगत आहेत, आणि वनविभाग केवळ पाहत बसला आहे. रोणापालचे माजी सरपंच सुरेश गावडे यांनीही वनविभागावर संशय घेतला. वनविभागाकडून केवळ तोंडी आश्वासने दिली जात आहेत. प्रत्यक्ष काम नाही. शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान वाढत असताना अधिकार्यांकडून चुकीची माहिती दिली जाते, असा आरोप त्यांनी केला.
मडुरा व परिसरात सध्या भात कापणी सुरू आहे. पण ओंकार हत्तीच्या वावरामुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. परिणामी, कापणीची कामे ठप्प झाली आहेत. हत्तीमुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत सापडले आहेत. वनविभागाने तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी उपसरपंच गावडे यांनी केली.
वनविभागाच्या सूत्रांनुसार, ओंकार च्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात असून त्याला जंगलाकडे हुसकावून लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी दोन-तीन दिवसांत हत्ती पकड मोहीम सुरू होईल असे सांगितले होते, मात्र अद्याप प्रत्यक्ष हालचाल न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप पसरला आहे.
हत्ती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने वनविभागाची चिंता वाढली आहे. ओंकार हत्ती आक्रमक स्वभावाचा असून कोणत्याही क्षणी दुर्घटना होऊ शकते, असा इशारा वनपाल दाजी पाटील यांनी दिला. वनविभागाकडून नागरिकांना दूर राहण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत आहे, मात्र अनेक जण उत्सुकतेपोटी घटनास्थळी जात असल्याचे दिसून आले.