

सावंतवाडी : सन 2014 ला खासदार नारायण राणेंची प्रतिमा खराब करण्यास प्रथम कोणी सुरूवात केली? आ. नीलेश राणेंच्या विरोधात खासदारकीच्या निवडणुकीत शड्डू कुणी ठोकला? असे सवाल करत केसरकर मात्र आज ‘नारायण राणेंच्या विरोधात कट रचला जातोय’ असे सांगतात, हे हास्यास्पद आहे, अश्या शब्दात पालकमंत्री नीतेश राणे यांनी शिवसेनेचे आ. दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला. आजारपण व निवडणुकीचा काय संबंध आहे? असा सवाल करत आपला राजघराण्याला पाठिंबा नाही, असे आ.दीपक केसरकर यांनी एकदा जाहीर सांगावेच, असे आव्हानही मंत्री नितेश राणे यांनी केसरकर यांना दिले. आम्हाला जनतेला केंद्रस्थानी ठेवून विकास करायचा आहे. सिंधुदुर्गातील शहरे विकसीत, शांत आणि सुखात ठेवायचे आहे. हे आपले निवडणूक लढविण्याचे उद्दिष्ट आहे असेही मंत्री राणे म्हणाले.
सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ना. राणे बोलत होते. सावंतवाडी शहराला युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुंदरवाडी म्हणून अधिक भक्कम करण्याची योजना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री म्हणून स्वतः मी आणि खा. नारायण राणे राजघराण्यामागे उभे आहोत. पुढील 4 वर्षांत रोजगार आणि विकास कामांवर भर दिला जाईल. 2 डिसेंबरनंतर मतदान झाल्यावर दीपक केसरकर आणि आम्ही एकत्र बसून महायुती म्हणूनच पुढे कारभार करणार आहोत.
ना. राणे पुढे म्हणाले, नगरपरिषद निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आहे. भाजप म्हणून आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढत आहोत. मतदारांपर्यंत ‘डोअर टू डोअर’ आम्ही पोहोचत आहोत. जिल्ह्यातील वातावरण आम्ही खराब करणार नाही. विकासाच्या अजेंड्यावर आम्ही मते मागत आहोत. मी पालकमंत्री आहे, चांगली आरोग्य सुविधा देण्याची जबाबदारी माझी आहे. स्थानिक डॉक्टरांना विश्वासात घेऊन मल्टीस्पेशालिटीबाबत निर्णय घेऊ. गोव्याला उपचार आणि रोजगारासाठी लोक जातात हे आम्हाला आवडत नाही, असे ते म्हणाले. युवराज लखमराजे भोंसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, मंदार कल्याणकर आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, मल्टिस्पेशालिटीच्या मुद्द्यावरून राजघराण्याला बदनाम केले जात आहे. परंतु गेली अनेक वर्षे मंत्री आणि आमदार असलेल्या दीपक केसरकर यांना हा प्रश्न का सोडवता आला नाही?, त्यांनी याचे उत्तर द्यावे. आपण सावंतवाडी शहर गेली तीस वर्षे शांत ठेवले आहे. त्यामुळे चुकीच्या लोकांना निवडून देऊ नका, असे आवाहन आ. केसरकर यांनी केले होते. याबाबत राणे यांना छेडले असता ते म्हणाले, मी पालकमंत्री असताना असा कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप हे दिशाभूल करणारे आहेत. काही झाले तरी जिल्हा शांततेत आणि सुखात ठेवायचा आहे. त्यामुळे ही नैतिक जबाबदारी माझी सुद्धा आहे. मी पालकमंत्री असताना जिल्ह्यात काहीही चुकीचे होऊ देणार नाही.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा आणि प्रचारात कणकवलीचा समावेश नसल्याबद्दलही ना. नीतेश राणे यांनी आक्षेप घेतला. जिल्ह्यात प्रचारासाठी येणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कणकवलीत का येत नाहीत? त्यांनाही कणकवलीतही प्रचार सभा घ्यायला हवी, उद्धव ठाकरे शिवेसेनेच्या जिल्हाप्रमुखांसाठी त्यांनी मत मागायला हवे अशी उपरोधिक प्रतिक्रिया ना. राणे यांनी व्यक्त केली.