

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चारही नगरपालिकांच्या निवडणुका आम्ही भारतीय जनता पार्टीकडून केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढतो आहोत. कोणत्याही प्रकारचे गलीच्छ राजकारण आणि टिका-टिप्पणी करण्यात आम्हाला रस नाही. अरे ला कारे करण्यासाठी ही निवडणूक नाही. वेंगुर्लेजवळ पंचतारांकित हॉटेल उभारणे, अद्ययावत हॉस्पिटल निर्माण करणे आणि वेंगुर्ले शहराचा आणखी मोठ्या प्रमाणात विकास करणे, हेच आमचे ही निवडणूक लढविण्यामागे उद्दिष्ट आहे, असे भाजप नेते सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ले येथे पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. सोबत भाजपचे वेंगुर्ले नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजन गिरप आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी उपस्थित होते.
ना. नितेश राणे म्हणाले, देशात, राज्यात भाजपची सत्ता आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून मी काम करतो. सत्तेचा वापर करून आम्ही या चारही शहरांचा विकास करणार आहोत, त्यासाठी आम्ही जनतेसमोर जात आहोत. वेंगुर्ले नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून काम केलेल्या राजन गिरप यांनी वेंगुर्ला शहराचे नाव अनेक पारितोषिके पटकावून देशात नेले. यापुढे आदर्श वेंगुर्ले शहर निर्माण करणे, वेंगुर्लेवासीयांचे भवितव्य घडविणे यासाठी आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. जेव्हा गिरप यांच्या नावाने नगराध्यक्ष बसतील, सर्व नगरसेवक बसतील तेव्हा पालकमंत्री या नात्याने वेंगुर्ले शहराचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आपली आहे.
पालकमंत्री पदाच्या पाच वर्षांच्या काळामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासाचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही, यासाठी मी प्रयत्न करतोच आहे. पण त्याबरोबरच झी सिनेमा ॲवॉर्ड कार्यक्रम वेंगुर्लेमध्येच घेण्यात येणार आहे. त्याचा फायदा पर्यटनदृष्ट्या सिंधुदुर्ग आणि वेंगुर्लेला होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे हे सुध्दा वेंगुर्ले आणि इतर शहरांमध्ये प्रचारासाठी येणार आहेत, अशी माहितीही ना. राणे यांनी दिली. महायुतीला गालबोट लागेल, असे वक्तव्य कुणी करू नये, असेही ते म्हणाले. आ. नीलेश राणे आपल्या पक्षाचे काम करत आहेत. विरोधकांना राजकारण करण्यासाठी शेवटी राणे यांचीच ताकद लागते, असा टोलाही पालकमंत्री राणे यांनी लगावला.