कुडाळ : आजचा दिवस शिवसेना आणि कोकण वासियांसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे, माजी खासदार निलेश राणे हे स्वगृही परतले आहेत. निलेश राणे यांनी हातात धनुष्यबाण घेतला, ही एक प्रकारे घरवापसी आहे. लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा विजय झाला. ही एक झाकी है, अब शिवसेना बाकी है..! असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास दिला.
कुडाळ हायस्कुलच्या मैदानावर बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी खासदार निलेश राणे यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आमदार रविंद्र फाटक, आ.नितेश राणे, उद्योजक भैय्या सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, जिल्हा प्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक रूपेश पावसकर, महिला जिल्हाध्यक्षा वर्षा कुडाळकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी आदी शिवसेना भाजपा महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते निलेश राणे यांच्या हाती शिव धनुष्य व भगवा झेंडा देत शिवसेनेत जाहीर प्रवेश दिला. यावेळी उपस्थित शेकडो समर्थकांनी जोरदार घोषणा देत निलेश राणे यांच्या प्रवेशाला समर्थन दिले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, निलेश राणे यांच्या प्रवेशामुळे आजपासून महायुतीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. तसेच शिवसेना आणि महायुतीची ताकद वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे विजय झाले. त्या विजयात कुडाळ विधानसभा मतदारसंघातून २६ हजाराचे मताधिक्य होते. मात्र आता आजच्या उपस्थितीवरून निलेश राणे यांना या विधानसभा निवडणुकीत ५२ हजार मताधिक्य मिळेल याची मला गॅरंटी आहे.
निलेश राणे यांना शिवसेनेत प्रवेश देण्यासाठी बरेच दिवस बोलणी सुरू होती, शिवसेना आणि भाजप आम्ही एकच आहोत. आताच दिवाळी येत आहे या दिवाळीत विजयाचे फटाके फोडा पण २३ नोव्हेंबरला निलेश राणे यांच्या विजयाचे फटाके फोडण्यासाठी मी स्वतः येईल असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला. कोकणात नारायण राणे यांनी ज्या ठिकाणाहून आपल्या राजकारणाची सुरुवात केली त्या ठिकाणीच निलेश राणे शिवसेनेत प्रवेश कर्ते झाले, म्हणजे एक प्रकारे एक वर्तुळ पूर्ण झाला आहे. असेही ते म्हणाले.
कुडाळ हायस्कूल येथील मैदानावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात व्यासपीठावरील भव्य डिजिटल स्किनवर नवी दिशा,अध्याय नवा...कुडाळ मालवणला बदल हवा, ठेवुनी हिंदुत्वाची जाण.. पुन्हा एकदा धनुष्यबाण अशा आशयाची लक्षवेधी टॅग लाईन उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.