

सावंतवाडी : नेमळे परिसरातीत भातशेतीत गवारेड्यांनी धुमाकूळ घातला आहे. नुकतीच लावणी केलेली भातरोपे गव्यांनी तुडवल्याने तसेच खाऊन फस्त केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वन विभागाने या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी बाधित शेतकर्यांनी केली आहे.
नेमळे परिसरातील कुंभारवाडी, फौजदारवाडी, देऊळवाडी, एरंडवाकवाडी, धारकरवाडी, पाटकरवाडी आणि पोकळेनगर या भागात गव्यांचा वावर आहे. प्रत्येक ठिकाणी 15 ते 20 गव्यांचा कळप दिवसाढवळ्या दिसत आहे. नेमळे गावात जवळपास 50 ते 60 गव्यांचा वावर असावा, असा अंदाज आहे. हे गवे नुकतीच लावलेल्या भात रोपांची नासधूस करत आहेत. यासोबतच आंब्याची आणि काजूची कलमेही उपटून टाकत आहेत, ज्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
गव्यांच्या भीतीमुळे नेमळे गावातील जंगल परिसरातील सुमारे 300 एकर शेतजमीन पडीक राहिली आहे. वन विभागाकडून नुकसानीचे पंचनामे केले जातात; परंतु दिली जाणारी नुकसानभरपाई अत्यंत तुटपुंजी असते. त्यामुळे शेतकर्यांनी वन विभागाकडे प्रतिगुंठा नुकसानभरपाई वाढवून देण्याची किंवा गव्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. वारंवार लेखी अर्ज देऊनही वन विभागाकडून या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे