

Anjivade Patgaon Ghat
कुडाळ : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आंजिवडे–पाटगाव (भैरीची पाणंद) घाट रस्ता लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही रत्नागिरी–सिंधुदुर्गचे माजी खासदार नारायण राणे यांनी दिली. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून प्रकल्पाला गती देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘वेंगुर्ले बंदर आंजिवडे–पाटगाव कोल्हापूर घाट रस्ता कृती समिती’च्या पदाधिकाऱ्यांनी कणकवली येथील ओमगणेश निवासस्थानी खासदार राणे यांची भेट घेऊन या प्रलंबित मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी राणे यांनी प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेत सकारात्मक भूमिका दर्शवली.
विकासासाठी महत्त्वाचा दुवा
आंजिवडे घाट रस्ता तयार झाल्यास सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील अंतर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. फोंडा आणि आंबोली घाटांच्या तुलनेत वेंगुर्ले ते कोल्हापूर दरम्यानचे अंतर सुमारे ४० ते ४५ किमीने घटेल, तसेच प्रवासाचा वेळ किमान दोन तासांनी कमी होईल. केवळ ५ किमी लांबीचा हा घाट रस्ता कमी वळणांचा आणि सुरक्षित असल्याने अवजड वाहतुकीसाठीही सोयीचा ठरणार आहे.
या मार्गामुळे कोकणातील मासळी काही तासांत पश्चिम महाराष्ट्रात पोहोचू शकणार असून व्यापाराला चालना मिळेल. तसेच कोल्हापूरची अंबाबाई आणि रेडीचा गणपती यांना जोडणारे नवे पर्यटन सर्किट विकसित होण्याची शक्यता आहे.
रोजगाराच्या संधींना चालना
हा घाट रस्ता पूर्ण झाल्यास माणगाव खोरे आणि वेंगुर्ले परिसरातील युवकांना पर्यटन, होम-स्टे, हॉटेल व्यवसाय तसेच कृषी प्रक्रिया उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास कृती समितीने व्यक्त केला.
या बैठकीला समितीचे कार्यकारी अध्यक्ष प्रभाकर परब, सचिव साईनाथ नार्वेकर, माजी उपसभापती आर. के. सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद मेस्त्री, खरात गुरुजी, अनिल वायंगणकर आदी उपस्थित होते.
खासदार राणेंची भूमिका ठाम
हा घाट रस्ता दुर्गम भागाला मुख्य प्रवाहाशी जोडणारा ठरेल. केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने प्रकल्पाला गती देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे सांगत राणे यांनी लवकरच संबंधित पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे स्थानिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.