

कणकवली : नांदगाव ब्रीजखाली एका उघड्या टपरीजवळ अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने रविवारी दुपारी 1.30 वा. च्या सुमारास छापा टाकला. टपरीच्या पाठीमागे दारू विक्री करत असलेल्या अवधुत श्यामराव वाळके (मूळ रा. कसबा बावडा, ता.करवीर, जि.कोल्हापूर, सध्या शिवाजीनगर असलदे) याला ताब्यात घेतले. त्याने या व्यवसायाचे मालक पपी वायंगणकर हे असून त्यांच्या सांगण्यावरून मी हे काम करतो. मला विक्रीसाठी लागणारा दारूचा माल तेच आणुन देतात असे सांगितले. यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने टपरीतील दारूचा साठा जप्त करत अवधुत वाळके व पपी वायंगणकर (रा. असलदे) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
नांदगावात ब्रीजखाली असलेल्या एका टपरीच्या मागे अवैधरित्या गोवा बनावट दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने रविवारी दुपारी तेथे धाड टाकली. या कारवाईत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर, पोलिस हे.कॉ. श्री. गंगावणे, पोलिस उपनिरीक्षक आर.बी.शेळके, पोलिस हे.कॉ. ज्ञानेश्वर तवटे आदी अधिकारी पोलिस सहभागी झाले होते.
नांदगाव ब्रीजखाली एका उघड्या टपरीच्या पाठीमागे एक व्यक्ती किलतानाची पिशवी घेवून उभा असल्याचे त्यांना दिसून आले. त्या पिशवीमध्ये गोवा बनावट दारूच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या प्लास्टीक तसेच काचेच्या बाटल्या दिसून आल्या. त्या व्यक्तीकडे विचारणा केली असता आपले नाव अवधुत श्यामराव वाळके असल्याचे सांगत या गैरदारू व्यवसायाचे मालक पपी वायंगणकर असून मी हा व्यवसाय चालवितो व ते मला विक्रीसाठी लागणारा माल आणुन देतात असे सांगितले.
पोलिसांच्या पथकाने टपरीतील 12 हजार 100 रू.ची गोवा बनावट दारू जप्त केली. त्यामध्ये 180 मिलीच्या वेगवेगळ्या कंपनींच्या 52 प्लास्टीक व 9 काचेच्या बाटल्या व 750 मिलीच्या दोन काचेच्या बाटल्या आढळून आल्या. याची फिर्याद स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिस हे. कॉ. ज्ञानेश्वर तवटे यांनी कणकवली पोलिसात दिली. त्यानुसार अवैध दारूचा साठा गैरकायदा विनापरवाना चोरटा दारूचा धंदा करत असल्याचे आढळून आल्याने अवधुत वाळके व पपी वायंगणकर यांच्याविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.