

देवगड : देवगड- जामसंडे नगरपंचायतीची गुरुवारी झालेली सर्वसाधारण सभा ठेकेदारांच्या विषयावरून गाजली. जनतेच्या सोयीसुविधांसाठी शासनाकडून निधी मंजूर केला जातो. मात्र ठेकेदाराकडून वेळेत कामे पूर्ण होत नसतानाही त्या कामांना वाढीव कालावधी दिला जातो. न. पं. ला सक्षम ठेकेदार का मिळत नाही? न. पं. प्रशासन ठेकेदारांच्या अजून किती आहारी जाणार आहे? असा सवाल नगरसेवक नितीन बांदेकर यांनी केला. मनमानीपणे सभागृहात कोणतेही निर्णय घेऊन त्यावर चुकीचे ठराव घेतले गेले तर प्रशासनाची गय करणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.
देवगड- जामसंडे न. पं. सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बांधकाम सभापती शरद ठुकरुल, आरोग्य व स्वच्छता सभापती आद्या गुमास्ते, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे, नगर अभियंता विवेक खोत आदी उपस्थित होते. न. पं. हद्दीतील कुणाचेही नळकनेक्शन बंद करू नये.
सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणारे विषय इतिवृत्तात नमूद होत नसून केलेल्या सूचनांची दखल घेतली जात नाही, अशी नाराजी नितीन बांदेकर यांनी व्यक्त केली. काही ठेकेदारांकडे एकापेक्षा अधिक कामे असल्याने कामे अर्धवट राहत आहेत. त्यामुळे कामे पूर्ण झाल्याशिवाय ठेकेदारांना बिले अदा करूनये, अशी सूचना संतोष तारी यांनी केली.
रजिस्ट्रेशन संपलेल्या ठेकेदारांना कामे दिली जातात व त्यांची बिले प्रशासनाकडून अदा केली जात असल्याचे बुवा तारी यांनी सांगितले. अपूर्ण कामांबाबत नियमानुसार दंड वसूल करून महिन्याचा वाढीव कालावधी देण्याचा ठराव घेण्यात आला. न. पं. कर्मचार्यांच्या किमान वेतनाबाबत पालकमंत्र्यांनी सूचना करूनही किमान वेतन लागू केलेले नाही. याकडे प्रशासनापे लक्ष वेधण्यात आले. दहिबाव पाणी पुरवठा योजनेचे नूतनीकरण व बळकटीकरण काम करताना ठेकेदाराने प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता नळयोजनेच्या इतर कामांवर निधी खर्च केला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराचे उर्वरित बिल अदा करणे अयोग्य असल्याचे सांगत या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप बुवा तारी यांनी केला.
सभापती आद्या गुमास्ते यांनी गणेशोत्सवातील स्वच्छता नियोजनाची माहिती दिली. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावेत, अशी सूचना रुचाली पाटकर यांनी केली.
देवगड व तारामुंबरी स्मशानभूमीत अर्धवट स्थितीत जळून राहणार्या पार्थिवांची कुत्र्यांकडून हेळसांड केली जात असून तेथे उपाययोजना राबविण्याची मागणी व्ही. सी. खडपकर यांनी केली. नगरसेविका तन्वी चांदोस्कर, नगरसेविका अरुणा पाटकर, मनीषा जामसंडेकर, स्वरा कावले, रोहन खेडेकर, सुधीर तांबे आदी उपस्थित होते.