

सावंतवाडी : सावंतवाडी-माठेवाडा येथील सौ. प्रिया पराग चव्हाण (वय 33) या विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिची नणंद, देवगडच्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सौ. प्रणाली मिलिंद माने (42) आणि त्यांचा मुलगा आर्यन मिलिंद माने (18) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या शोधासाठी सावंतवाडी पोलिसांचे पथक देवगड येथे गेले. मात्र संशयितांनी पोलिसांना हुलकावणी दिली.
विवाहिता प्रिया चव्हाण हिचा मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप प्रियाच्या आई-वडिलांनी केल्यानंतर त्यांचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिची नणंद सौ. प्रणाली मिलिंद माने व आर्यन मिलिंद माने यांच्यावर अटकेची पुढील कारवाई करण्यासाठी सावंतवाडी पोलिस उपनिरीक्षक सरदार पाटील, महिला पोलिस अधिकारी सौ. माधुरी मुळीक यांचे पथक सोमवारी देवगड येथे संशयित यांच्या शोधासाठी रवाना झाले. मात्र, त्यांना तिथे कोणीही आढळून आले नाही. पोलिसांनी संशयितांचा त्यांच्या घरी व अन्य ठिकाणी शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत.
या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सौ. माधुरी मुळीक करत आहेत. सौ. प्रणाली आणि तिचा मुलगा आर्यन मिलिंद माने यांचा शोध घेतला. तसेच याप्रकरणी अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. देवगड येथे संशयितांच्या अटकेसाठी गेलेल्या सावंतवाडी पोलिसाना खाली हात माघारी परतावे लागले.
दरम्यान, मृत प्रिया चव्हाण यांचा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात असून तो अधिक तपासासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहे. संशयितांचे मोबाईल लोकेशन मिळवण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. या प्रकरणी आणखी काही पुरावे मिळतात का, याचीही चाचपणी पोलिस करत आहेत.