

वैभववाडी : पुढारी वृत्तसेवा
मित्रांसोबत फिरायला आलेल्या मुंबईतील तरुणाचा कोकीसरे येथील बंधाऱ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सिद्धांत प्रकाश जाधव (रा. तारारोड, शिवाजी नगर, सांताक्रूझ, मुंबई) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.
प्रसाद वळंजू यांच्यासह मुंबईतील चौदा मित्रांचा ग्रुप १० जुलै रोजी कोकीसरे येथे फिरण्यासाठी आला होता. शनिवारी ११ जुलैला दुपारी या सर्वांनी पार्टी केल्यानंतर सायंकाळी ३.३० वा. च्या सुमारास कोकीसरे येथील सार्वजनिक गणपती विसर्जन घाटावरील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेले. काही मित्र पाण्यात उतरले, तर काहीजण बंधाऱ्यावर बसले होते.
सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास सिद्धांत जाधव दिसत नसल्याचे मित्रांच्या लक्षात आले. त्याचे कपडे, मोबाईल व चप्पल पाण्याजवळच आढळून आले. त्यानंतर मित्रांनी परिसरात शोधाशोध केली. गावचे पोलिसपाटील व सरपंच यांनाही माहिती देण्यात आली. रात्री वैभववाडी पोलिसांनी घटनास्थळी येऊन शोधमोहीम सुरू केली. मात्र, अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले.
रविवारी सकाळी पुन्हा पोलिस, मित्र व ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली. सकाळी ८.४५ वा. च्या सुमारास बंधाऱ्यातील सुमारे पंधरा ते वीस फूट खोल पाण्यात सिद्धांत जाधव याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. सिद्धांत हा मूळ कणकवली येथील नरवडे गावचा आहे. त्याच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे.