

After a day-long search operation, the bodies of all five youths involved in the Ganpatipule tragedy were found
छत्रपती संभाजीनगर/बीडकिन : पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे शनिवारी समुद्रात बुडालेल्या पाचही तरुणांचे मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे. हे सर्व तरुण बिडकीन येथील रहिवासी होते. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने रविवारी (दि.२१) याबाबतची माहिती दिली.
आदित्य संतोष राऊत (२२), अनिकेत बंडू हिवराळे (२०), आनंद राजू नरवडे (२०), प्रेम दीपक आदमाने (१९), यश रामेश्वर कांबळे (१९) असे समुद्रात बुडून मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत.
बिडकीन येथील काही तरुण सुटीचा आनंद घेण्यासाठी गणपतीपुळे येथे गेले होते. गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर हे १९ तरुण समुद्रकिनाऱ्यावर गेले. यातील ८ तरुण पोहण्यासाठी समुद्रात शिरले होते. मात्र लाटांच्या वेगाचा अंदाज न आल्याने आठही तरुण बुडू लागले. स्थानिक पोलिस व जिल्हा प्रशासनाने स्थानिक मच्छिमार, जीवरक्षक आणि नागरिकांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य सुरू करत तीन तरुणांना बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान, इतर पाच जणांचा शोध युद्धपातळीवर सुरू होता. समुद्राच्या वेगाच्या लाटांमुळे अडचणी येत होत्या.
हे तरुण खोल पाण्यात वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त होत होता. यासाठी ड्रोनचीही मदत घेण्यात आली. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ४.५५ वाजता प्रेम आदमाने याचा मृतदेह मालगुंड खाडी किनाऱ्याजवळ आढळून आला. रविवारी सकाळी उर्वरित चौघांपैकी अनिकेत हिवराळे (२०) या तरुणाचा मृतदेह मालगुंड, भंडारवाडा, जिल्हा रत्नागिरी येथे आढळून आला. तर यश कांबळे (१९) याचा मृतदेह मालगुंड भंडारवाडा येथे आढळून आला यासोबतच काही वेळाने आदित्य राऊत (२२) आणि आनंद नरवडे (२०) याचा मृतदेह मालगुंड, रत्नागिरी समुद्रकिनारी आढळून आला.
घटनेतील सर्व पाचा मृतदेह मिळाले असल्याची माहिती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. पर्यटनासाठी गेलेल्या मित्रांच्या या समूहावर अचानक कोसळलेल्या या संकटामुळे संपूर्ण बिडकीन परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.
चौघाचे बिडकीन तर एकाचे सोमापुरीत अंत्यसंस्कार
यापैकी चार जणांवर बिडकीन येथे तर एका तरुणावर सोमपुरी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे सोमवारी (दि.२२) बिडकीन येथील व्यावसायिक आपली प्रतिषठाने, दुकाने बंद ठेवणार आहेत. स्कूलबस चालकही बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती रूपेश शिंदे यांनी दिली.