

सावंतवाडी : धकाधकीच्या जीवनात शिक्षणापासून वंचित राहणार्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदव्या घेता येणार आहेत आणि विशेष म्हणजे यातील एक पदवी बाहेरून (एुींशीपरश्र) घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नव्या धोरणांतर्गत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांसोबत विद्यापीठाने करार केला असून, त्यापैकी श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी हे पहिले महाविद्यालय ठरले आहे.
या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत विद्यापीठाच्या अधिकार्यांनी ही घोषणा केली. संचालक डॉ. शिवाजी सरगर, भोसले नॉलेज सिटीचे अध्यक्षअच्युत भोसले, प्रा.अनिल बनकर, प्रा.दिलीप भारमल, मंदार भानुसे, डॉ.लिलाधर बनसोडे, सुभाष वेलिंग आदी उपस्थित होते.
डॉ. सरगर यांनी सांगितले की, कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून आणि पदवीपासून वंचित राहू नये, यासाठी मुंबई विद्यापीठाच्या टीमने हा पुढाकार घेतला आहे. या योजनेत बारावी आणि पदवीनंतरचे शिक्षण घेता येणार आहे. एम.कॉम आणि एम.एस.सी यांसारख्या तब्बल 28 अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे. हे अभ्यासक्रम या वर्षापासून सुरू होणार आहेत.
संबंधित विद्यार्थी एकाच वेळी दोन पदव्यांसाठी प्रवेश घेऊ शकतो. यात एका पदवीसाठी 75 टक्के हजेरी आवश्यक असेल, तर दुसर्या अभ्यासक्रमासाठी हजेरीची कोणतीही अट नाही. संबंधित अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीनेही शिक्षण घेऊ शकतो.
हे अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून घेण्यात येणार असल्याने संबंधित विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. ही पदवी नियमित अभ्यासक्रम आणि पदवीच्या तोडीची असेल.
एखादा विद्यार्थी राज्यात कोणत्याही केंद्रातून ही पदवी प्राप्त करू शकतो. कोकणातील सात जिल्ह्यांमध्ये ही केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत, ज्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. कोकणात पहिल्यांदा श्री पंचम खेमराज महाविद्यालयाला हा करार करण्याचा मान देण्यात आला. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष व सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप भारमल यांनी हा करार स्वीकारला.