

नांदगाव : मुंबई-गोवा महामार्गा दुतर्फा सध्या अस्वच्छता दिसून येत आहे. सध्या खारेपाटण ते कलमठ टप्प्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व काही भंगार व्यावसायिक उपयोगी नसलेला माल, भाजी विक्रेत्यांचा नाशवंत माल व पिशव्या फेकलेल्या दिसत आहेत. यामुळे स्वच्छ सिंधुदुर्गला अस्वच्छतेचे दर्शन दिसून येत असल्याने या महामार्गालगत टाकावू वस्तू टाकून घाणीचे साम्राज्य निर्माण करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यातील अनेक भागात स्वच्छतेविषयी जागृकता होत आहे. तरीही जिल्ह्यातील काही रस्त्यावर मोठया प्रमाणात घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. स्थानिक प्रशासन ते जिल्हा प्रशासन वेळोवेळी स्वच्छतेचे संदेश देत असतात. मात्र काही नागरिक,भंगार व्यावसायिक व परजिल्हातील भाजीविक्रेते या आदेशांना केराची टोपली दाखवताना दिसतात. दरम्यान मुंबई-गोवा महामार्गासह देवगड-निपाणी राज्य मार्गावरील अनेक भागात रस्त्यालगत ठिकाणी प्लास्टीकसह भंगार व्यावसायिक, परजिल्हातील भाजी विक्रेते मोठया प्रमाणात नाशिवंत मालासह, पुठयांचे बॉक्स, पिशव्या व इतर वस्तू टाकून जात असल्याचे दिसून येत आहे.
या मार्गालगत सध्या घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही ठिकाणी तर कचरा व प्लास्टिकचे ढीगच्या ढीग आढळून येत आहेत. हा टाकावू माल रात्रीची वेळ साधून टाकण्यात येत असल्याने हा कचरा नेमका कोण टाकतो हे समजून येत नाही. याच नाशिवंत घाणीच्या साम्राज्यामुळे मार्गावर मोकाट जनावरे येत असल्याने अपघाताची शक्यताही निर्माण होते. अशी घाण करणार्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी स्वच्छताप्रेमीं नागरिकांकडून केली जात आहे.