Sindhudurg Accident : वडिलांच्या गाडीचा धक्का बसून चिमुकलीचा मृत्यू

देवगड-तळवडे गावातील हृदयद्रावक घटना
Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

देवगड : तळवडे -परबवाडी येथे बोलेरो पिकअपच्या मागील चाकाचा धक्का बसून तेथिल रूंजी हरेश परब या चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी ३.३० वा. सुमारास घडली. या घटनेमुळे देवगड तालुक्यात हळहळ होत आहे

तळवडे -परबवाडी येथील हरेश परब हे आई, पत्नी, मुलगा रूद्र व मुलगी रूंजी यांच्यासमवेत राहतात. ते मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी पांडूरंग कदम यांची बोलेरो पिकअप गाडी कामानिमित्त घरी आणली होती. ही गाडी पांडूरंग कदम यांना देण्यासाठी रविवारी दुपारी ३.३० वा.सुमारास ते घराकडून निघाले होते. यावेळी त्यांचा गाडी क्लिनर सीटवर त्यांची मुलगी रूंजी ही बसली होती. तिने गाडीतून उतरण्याचा हट्ट केल्याने हरेश यांनी तिला घरी जाण्यास सांगितले.

ती गाडीतून उतरल्यावर ती घरात गेल्याचे समजून हरेश यांनी गाडी सुरू केली. दुर्दैवाने गाडीच्या क्लीनर साईडला असलेल्या रूंजी हिला गाडीच्या मागील चाकाचा ध बसला. या घटनेत रूंजी हिच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. ही घटना लक्षात येताच परब दांपत्य व महेश लाड यांनी रूंजी हिला तात्काळ देवगड येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले. तेथून तिला देवगड ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. परंतू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची फिर्याद हरेश परब यांचे चुलत भाऊ आनंद शांताराम परब (४८) रा. तळवडे परबवाडी यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली. सहा. पोलिस निरिक्षक सुप्रिया बंगडे, महिला पोलिस हवालदार विनीता भुजे, पोलिस हवालदार गणपती गावडे यांनी देवगड ग्रामीण रूग्णालयात भेट देवून घटनेची माहिती घेतली व पंचनामा केला. देवगड ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून सायंकाळी उशिरा मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला. या घटनेचा तपास पोलिस हवालदार आशिष कदम करीत आहेत.

आई -वडिलांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा

चिमुकलीचा अपघाती मृत्युने तिच्या आई-वडिलांनी देवगड ग्रामीण रूग्णालयात केलेला आक्रोश उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. या अपघाताचे वृत्त तळवडे गावातील नागरिकांनी देवगड ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली. रूंजी हिच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ, आजी असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news