

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील मध्यवर्ती आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या संस्थानकालीन मोती तलावाला कचर्यामुळे अवकळा आली आहे. तलावाच्या काठावर प्लास्टिकच्या बाटल्या आणि इतर कचरा मोठ्या प्रमाणात साचल्याने या नयनरम्य स्थळाचे सौंदर्य धोक्यात आले आहे.
या गंभीर समस्येकडे सावंतवाडी नगरपरिषदेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सायंकाळच्या वेळी अनेक नागरिक मोती तलाव परिसरात विरंगुळ्यासाठी येतात. मात्र, काही बेजबाबदार नागरिक पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे वेष्टन आणि इतर कचरा तलावातच फेकतात. यामुळे तलावाचे पाणी दूषित होत असून, प्लास्टिक कचर्यामुळे तलावाच्या सौंदर्याला बाधा येत आहे.
विशेष म्हणजे, या कचरा टाकणार्यांवर कारवाई करण्यासाठी नगरपरिषदेने ठोस पाऊल उचललेले नाही. सध्या सावंतवाडी नगरपरिषदेत प्रशासक राजवट असूनही शहराच्या स्वच्छतेकडे आणि सौंदर्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे चित्र आहे. स्वच्छता विभागाच्या निष्क्रियतेमुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.
शहराच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक महत्त्वाच्या मोती तलावाची अशी दुर्दशा होणे हे सावंतवाडीसाठी नक्कीच भूषणावह नाही. यामुळे केवळ तलावाचे नैसर्गिक सौंदर्यच धोक्यात आले नाही, तर पर्यावरणाचा समतोलही बिघडण्याची शक्यता आहे. सावंतवाडीतील नागरिकांनी प्रशासनाला तातडीने या प्रकरणी लक्ष देण्याची मागणी केली आहे. तलावात कचरा फेकणार्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच तलावाच्या काठावर कचराकुंड्यांची व्यवस्था करावी आणि स्वच्छतेबाबत जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.