

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील मोरे गावातील अनधिकृत बंदूक कारखाना प्रकरणी पोलिसांना अजून दोघांना ताब्यात घेतले आहे. कृष्णा आप्पा धुरी (62, रा. माणगाव) याला बुधवारी रात्री तर गुरुवारी मुंबईत अन्य एकाला ताब्यात घेतले आहे. तो मुळ मालवण तालुक्यात राहणारा आहे. त्याचे नाव समजू शकले नाही.
दरम्यान यातील शांताराम दत्ताराम पांचाळ (42, रा. मोरे) आप्पा कृष्णा धुरी (32, रा. माणगाव) तसेच कृष्णा आप्पा धुरी या तिघांना वेगुर्ले न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तर प्रकाश राजाराम गुरव (40 आजरा), व सागर लक्ष्मण गुरव (रा. नांदरूख, मालवण) व यशवंत राजाराम देसाई या तिघांना पुन्हा पोलिस कस्टडीत घेण्याच्या हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे देण्यात आले आहेत.
या कारखान्यातून बंदूका विकत घेणार्यांची कसून चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. पोलिसांनी कृष्णा धुरी याला अटक केली आहे. त्याच्याकडून आता नव्याने माहिती मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान या अंतर्गत मूळ मालवण येथील व मुंबई वास्तव्यास असणार्या आणखी एका संशयिताला पोलिसांनी मुंबईत ताब्यात घेतले आहे.
त्याच्याकडूनही आता अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. ताब्यात असलेल्या संशयितांकडून योग्य ती माहिती पोलिसांना मिळत नाही. कोणाला बंदुका विक्री केल्या त्यांची फक्त आडनावे मिळत असल्याने पोलिसांना तपास कामात अडथळे येत आहेत. मात्र तरीही पोलिस अनेक तांत्रिक घटकांचा आधार घेत या संशयित आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत अशी माहिती कुडाळ पोलिस निरीक्षकांनी दिली.