

देवगड : इतिहास घडविणारा आणि गावरयतेत नवचैतन्य निर्माण करणारा प्रसंग मिठबाव येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. तब्बल 300 वर्षांच्या कालावधीनंतर श्री गजबादेवी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव पुन्हा एकदा ग्रामदैवत श्री देव रामेश्वरांच्या सहकार्याने दिमाखात साजरा होणार आहे.
हा भव्य सोहळा सोमवार, 22 सप्टेंबर ते गुरुवार, 2 ऑक्टोबर या कालावधीत साजरा होणार असून, या ऐतिहासिक क्षणाची प्रतीक्षा संपूर्ण गावकरी मोठ्या उत्कंठेने करत आहेत. या निमित्त रविवारी श्री देव रामेश्वर स्वारीने संपूर्ण साजशृंगारात ग्रामदेवता श्री गजबादेवी मंदिराकडे दुपारी प्रस्थान केले. या वेळी बारा पाच मानकरी, देवसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
नवरात्रौत्सव निमित्त सोमवार 22 सप्टेंबर रोजी घटस्थापनेने या शारदीय नवरात्र उत्सवाचा शुभारंभ सकाळी 9 ते 12 वा. होणार आहे. त्यानंतर उत्सव कालावधीत दररोज सकाळी नित्यपूजा, सायं. 7 वा. सांजआरती व भजने होणार आहेत.
गुरुवार, 2 ऑक्टो. रोजी विजयादशमी कार्यक्रमाने या उत्सवाची सांगता होईल. हा सोहळा मिठबाव गावाच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरणार असून, सुमारे 300 वर्षांनंतर पुन्हा एकदा श्री गजबादेवी मातेसमोर भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा संगम पाहायला मिळणार आहे. या नवरात्र उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान समिती, मिठबाव यांनी केले आहे.