

कुडाळ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कुडाळ-पावशी बेलनदी आणि भंगसाळ नदीवरील पुलांवर भगदाड पडून वाहतुकीला धोका निर्माण झाल्याने ठेकेदार कंपनीने दुरूस्तीचे काम गणेश चतुर्थीपूर्वी हाती घेतले होते, मात्र दुरुस्ती अर्धवट अवस्थेत ठप्प आहे. काम रखडल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.
गेल्या पाऊण महिन्यापासून गोव्याकडे जाणार्या या लेनवर दुरुस्ती सुरू असल्याने पावशी मार्कंडेय मंदिर ते कुडाळ काळप नाकापर्यंत लेन वाहतुकीस पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. सध्या दोन्ही दिशांची वाहतूक मुंबईकडे जाणार्या एकाच लेनवरून सुरू आहे. चार दिवसांपूर्वी बेलनदी पुलानजीक कुडाळहून सिंधुदुर्गनगरीच्या दिशेने जाणार्या एका मोटारसायकलस्वाराने पादचार्याला मागाहून धडक दिली. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी गोवा ते मुंबई जाणारा मालवाहू ट्रक समोरून येणार्या वाहनाला बाजू देत असताना लेनच्या साईडपट्टीवर चिखलात रुतून बसला.