

कणकवली : रेल्वे प्रवासात बेपत्ता झालेले सुधाकर उर्फ सुधीर बुधाजी गवस (46, रा. सासोली, ता. दोडामार्ग) हे सोमवारी सकाळच्या सुमारास रेल्वे मार्गावरील नागवे ब्रिजखाली नाल्यामध्ये मृत्तावस्थेत आढळून आले. सुधीर रेल्वेतून नेमके कसे खाली पडले, हे समजू शकलेले नाही.
सुधाकर गवस हे अंध मित्र समीर नाईक (रा. मणेरी, तेलीवाडी) यांच्यासोबत अंधबांधवांच्या मदतीसाठी असलेल्या चॅरिटी संस्थेकडून मिळणारे साहित्य घेण्यासाठी शनिवार 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी तुतारी एक्सप्रेसमधून मुंबईकडे प्रवास करत होते. सावंतवाडी रेल्वेस्थानक येथे ते ट्रेनमध्ये चढले. शनिवारी रात्री 7.30 वा सुमारास गाडी कणकवली स्थानकातून मार्गस्थ झाली.
मात्र त्यानंतर सोबतच्या अंधमित्राला सुधीर हे बोगीमध्ये दिसून आले नाहीत. त्यांनी याबाबत रेल्वेच्या 139 क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक राजेश सुरवाडे, सहाय्यक उपनिरीक्षक दुर्गेश यादव, हवालदार मेलशिंगरे आदींनी कणकवली ते नांदगाव या दरम्यानच्या रेल्वे ट्रॅक परिसरात सुधीर यांचा शोध घेतला. मात्र सुधीर रविवारी दिवसभरात आढळून आले नव्हते. रविवारी सकाळी समीर नाईक यांनी सुधाकर यांच्या गावी फोन करून घटना सांगितली. सोमवारी सकाळपासून पुन्हा एकदा रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी, कर्मचार्यांनी शोधमोहीम राबवायला सुरुवात केली. अखेरीस नागवे येथील रेल्वे पुलाखालील नाल्यामध्ये एक मृतदेह आढळून आला.
याबाबतची माहिती समजताच कणकवली पोलिस ठाण्याचे हवालदार चंद्रकांत झोरे व अन्य पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुधीर यांच्या नातेवाईकांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांनी पाहणी करून हा मृतदेह सुधीर यांचाच असल्याचे स्पष्ट केले.
सुधीर यांना मुंबईतील एका संस्थेकडून अन्नधान्य मिळायचे. हेच अन्नधान्य आणण्यासाठी सुधीर व सहकारी अंधमित्र मुंबईला जात होते. घटनेची खबर सुधीर यांचा भाऊ संजीवन बुधाजी गवस (42, सासोली) यांनी दिली. त्यानुसार घटनेची कणकवली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.