

कुडाळ : महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली शहरातील पोलिस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मटका केंद्रावर धडक देत पोलिसांना मटका बुकींवर कारवाई करण्यास भाग पाडल्यानंतर मटका व्यवसायिकामध्ये एकच हलचल माजली आहे. दुसरीकडे खाकी वर्दीतील काहीचे मटका बुकींशी जवळचे हितसंबंध आहेत पण आता कारवाई करण्याची वेळ आल्यामुळे त्या वर्दीतील लोकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. परिणामी असे वर्दीतील लोक मटका बुकींशी थेट संवाद साधून आम्हाला केससाठी एक कोणतरी द्या, अशी विनंती करत असल्याची चर्चा सुरू आहे.
खरंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली कित्येक दशके मटका हा अवैद्य व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. या व्यवसायाची कणकवली व सावंतवाडी हे दोन महत्त्वाची मोठी केंद्रं आहेत, या दोन केंद्रावरूनच संपूर्ण जिल्हाभरात मटक्याची उलाढाल होते. पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी स्वतः कणकवलीतील भरबाजारपेठेत मटक्याच्या मुख्य केंद्रावर धडक दिली आणि त्या मटका केंद्रावर पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले. या कारवाईनंतर जिल्हाभरातील मटका व्यावसायिक धास्तावून गेले.अनेकांनी आपल्या टपर्या झपाझप बंद केल्या.
इतर तालुक्यातील पोलीस निरीक्षकांनीसुद्धा आपली यंत्रणा ऍक्टिव्ह करत ठिकठिकाणी कारवाईचा सपाटा सुरू केला आहे मात्र बहुतांशी काही बीटमधील खाकी वर्दीतील लोकांचे मटका बुकींशी जवळचे संबंध असल्यामुळे कारवाई थेट कशी करणार? त्यासाठी आता खाकी वर्दीतील ही मंडळी मटका चालकांना फोन करून आम्हाला वरिष्ठांकडून कारवाईचे आदेश आहेत, त्यामुळे तुम्हीच कोणतरी आम्हाला व्यक्ती द्या जेणेकरून आम्ही कारवाई करता येईल, असे सांगत असल्याची चर्चा सुरू आहे.