

मारुती कांबळे
वैभववाडी : खांबाळे गावातील प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी मंगेश परशुराम कदम यांनी पारंपरिक भात लावणी पद्धतीला फाटा देत ‘एसआरटी’ पद्धतीने भात लागवडीचा अभिनव प्रयोग यशस्वी केला आहे. भात लावणीचा हा अभिनव ‘मंगेश पॅटर्न’ म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध होत आहे. कृषी अधिकार्यांनी या प्रयोगाची दखल घेत मंगेश कदम यांनी केलेल्या प्रयोगाचे कौतुक करीत जिल्ह्यातील अन्य शेतकर्यांनीही या भात लागवड पद्धतीचे अनुकरण करावे, असे आवाहन केले आहे.
भात हे कोकणातील प्रमुख पीक म्हणून ओळखले जाते. राज्य शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी मंगेश कदम हे जिल्ह्यातील एक प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. पारंपरिक भात शेतीसाठी मजुरांची कमतरता, वाढलेला खर्च आणि अनिश्चित उत्पादन या समस्येवर मात करण्यासाठी त्यांनी ‘सगुना पुनरुत्पादन तंत्रज्ञान’ म्हणजेच (एसआरटी )पद्धतीचा अभ्यास केला. हा प्रयोग गावात पहिलाच असल्याने सुरुवातीला शेतकर्यांनी विरोध केला. मात्र श्री.कदम यांनी जिद्द सोडली नाही.
मंगेश कदम यांनी आपल्या प्रयोगशीलतेतून आधुनिक तंत्रज्ञान आणि स्थानिक ज्ञान यांची सांगत घालून शेतीला अधिक फायदेशीर आणि टिकाऊ बनवता येते हे सिद्ध केले आहे. ‘एसआरटी’हा भात लागवडीचा केवळ एक प्रयोग नाही तर तो कोकणातील शेतकर्यांसाठी प्रेरणा सूत्र आहे. पारंपरिक पद्धतीच्या श्रमातून मुक्त होऊन उत्पादन वाढवण्याचा आणि खर्च कमी करण्याचा ‘एसआरटी’ हा नवा मार्ग आहे.
शेतीतील प्रगती सोबतच मंगेश कदम यांनी या अगोदर शेतात विविध प्रकारचा भाजीपाला, कलिंगड, फुलशेती व तालुक्यातील शेतकर्यांना एकत्र करीत गेले दोन वर्ष तालुक्यात हळद लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. शेतीत नवनवे प्रयोग करून उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने ते नेहमी प्रयत्नशील असतात. जिल्ह्यातील तरुणाने आधुनिक पद्धतीचा अवलंब करून शेती करावी यासाठी त्यांचा प्रयत्न करीत आहेत.
‘एसआरटी’ पद्धतीने भात लागवड कशी करतात?
गादीवाफे-यासाठी जमिनीवर विशिष्ट रुंदीचे गादीवाफे आणि त्यांच्यामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी सर्या तयार केल्या जातात.वाफे तयार करण्यासाठी बीबीएफ यंत्राचा वापर केला. टोकन पद्धत- रोप लावणी न करता तयार गादीवाफ्यावर विशिष्ट अंतरावर उदाहरणात 25 सेमी लोखंडी साच्याच्या मदतीने भाताचे चार ते पाच दाणे व रासायनिक खत उदाहरणार्थ 15/ 15 /15 टाकून टोकन केली जाते.
पाण्याचे व्यवस्थापन-गादी वाफ्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो. त्यामुळे पीक सडत नाही, आवश्यकतेनुसार पाणी दिले जाते. या पद्धतीमुळे भाताच्या रोपाला 45 ते 60 पर्यंत फुटवे येतात. ज्यामुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा एकरी दोन ते चार क्विंटल उत्पादन वाढू शकते. शिवाय लागवडीचा खर्च हा 50 ते 60 टक्क्याने कमी होतो.
तण नियंत्रण- ‘एसआरटी’ मध्ये तण नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे असते. यासाठी श्री. कदम यांनी टोकन झाल्यावर शिफारसी तणनाशकांची फवारणी केली. त्यामुळे उगवणीपूर्वीच तणांचा नाश झाला. या पद्धतीत भातपिक भरघोस व उत्कृष्ट दर्जाचे येत असल्यामुळे भाताच्या प्रत्येक चुडातून भरपूर लोंब्या आणि दाण्यांच्या संख्या पारंपारिक भात शेती पेक्षा अनेक पटीने जास्त आहे. त्यामुळे मंगेश कदम यांच्या या ‘एसआरटी’ पॅटर्नची शेतकरी उत्सुकतेने चौकशी करत आहेत.
‘एसआरटी’पद्धत म्हणजे काय?
‘एसआरटी’ म्हणजे सगुना पुनरुत्पादन तंत्रज्ञान ही एक शून्य मशागत आणि गादीवाफा आधारित अत्यंत क्रांतिकारी शेती पद्धत आहे. या पद्धतीत पारंपरिक भात लागवडीप्रमाणे नांगरणी,चिखलणी किंवा रोपांची लावणी करावी लागत नाही. त्यामुळे शेतकर्यांचे श्रम, वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात वाचतो. या पद्धतीत जमिनीची नांगरणी किंवा चिखलणी केली जात नाही त्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब टिकून राहतो, जमिनीची धूप थांबते आणि जमिनीतील नैसर्गिक गांडूळ सूक्ष्मजीव यांचे कार्य सुधारते.