

आचरा: मालवण-आचरा मार्गावर भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या चरामध्ये एसटी बस अपघातग्रस्त झाली.
रविवारी सायंकाळी मालवण बसस्थानकातून सुटलेली विजयदुर्ग बस वायंगणी हायस्कूल येथे एका वाहनाला बाजू देताना थेट चरात फसल्याने एका बाजूला कलंडली. चालकाने प्रसंगावधान राखत गाडी त्याचठिकाणी उभी करून सुरक्षित दरवाज्याच्या सहाय्याने प्रवाशांना बाहेर काढले. दरम्यान, वीज वाहिन्यांसाठी खोदलेल्या चरांमुळे सातत्याने अपघात होत असल्याने यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.
मालवण आगारातून रविवारी सायंकाळी सुटलेली मालवण-विजयदुर्ग गाडी 5.30 वा.च्या सुमारास वायंगणी हायस्कूल येथे आली असता, समोरून येणार्या वाहनाला बाजू देताना बस रस्त्यालगत खणलेल्या चरात फसली. वायंगणी ग्रामस्थ व रिक्षा व्यावसायिकांनी घटनास्थळी धाव घेत एसटीच्या आपत्कालीन दरवाजाचा वापर करत आतील 35 प्रवाशांना बाहेर काढले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, एसटी कलंडल्यामुळे प्रवासी वर्गात घबराट पसरली.