

मालवण : पुढारी वृत्तसेवा
शासकीय महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पर्यावरणाची हानी होत आहे. तळाशील गावच्या अस्तित्वाला व मानवी जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कालावल खाडीपात्रात गट अयेथे सुरू अवैध वाळू उपसा तसेच अवैध वाळू उत्खनन बोटी व संबंधित वाळू माफियांवर कठोर कारवाई व्हावी.
या मागणीसाठी तळाशील ग्रामस्थांनी कालावल खाडीपात्रात आंदोलन सुरू केले आहे. आपल्या मागण्यांवर ग्रामस्थ ठाम असून गेल्या चार दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सोमवारी या आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांसोबत चर्चा केली.
आम्ही सर्व ग्रामस्थांच्या सोबत आहोत. ग्रामस्थांच्या मागण्या व ग्रामस्थांची भूमिका आ. नीलेश राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे पोहोचवली जाईल. ग्रामस्थांना न्याय देण्याच्या दृष्टीने योग्य भूमिका घेतली जाईल. प्रशासन स्तरावरूनही योग्य ती कारवाई होईल, अशी भूमिका दत्ता सामंत यांनी मांडली.
तळाशील ग्रामविकास मंडळ यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने दत्ता सामंत यांना देण्यात आले. जयहरी कोचरेकर, अजित केणी, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, जिल्हापरिषद सदस्य वर्षा सांबारी, पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर, बंडू चव्हाण, भाऊ मोरजे, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, उद्योजक जयप्रकाश परुळेकर यांसह अन्य पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
तळाशील गावासमोरील रेवंडी कालावल खाडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वाळू माफीयांनी धुमाकूळ घातला आहे. या अवैद्य प्रकारामुळे केवळ पर्यावरणाचे नव्हे तर तळाशील गावच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे सांगत ग्रामस्थ म्हणाले. आम्ही आंदोलन सुरू केले त्यावेळी काही अवैध वाळू उत्खनन बोटी अगदी समोर होत्या. त्यावेळी प्रशासनाला सांगूनही त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही.
उलट आम्हालाच त्रास दिला जात आहे. मासेमारी हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे, तळाशील होडीने आमच्या मत्स्य विक्रेत्या महिला व व्यवसाय मिळालेले मासे घेऊन मालवण येथे विक्रीसाठी नेतात. मात्र रेवंडी जेटीवर मासे उतरवण्यास व तेथून प्रवास करण्यास अटकाव केला जात आहे. रेवंडी सरपंच ही अशाच भूमिका घेत आहेत. याचा विपरीत परिणाम आमची रोजीरोटी असलेल्या मासेमारी व्यवसायाला बसत आहे.
दुसरीकडे अनधिकृत वाळू उत्खननामुळे तळाशील गावच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. किनाऱ्याच्या बाजूने माती खचत असून माड बागायती तसेच अनेक घरांनाही धोका निर्माण होत आहे. प्रशासनाने अनधिकृत वाळू उपसा बाबत तसेच अनधिकृत वाळू उपशाच्या ज्या बोटीची आम्ही माहिती दिली त्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली. तसेच विविध मागण्यांचे निवेदन हे यावेळी दत्ता सामंत यांना देण्यात आले.
ग्रामस्थांच्या वतीने जयहरी कोचरेकर म्हणाले, कालावल खाडीतील बंदी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उपसा सुरू आहे. या वाळू उपसा मुळे तळाशील वाडी वाहून जाणार असेल तर अस्तित्व काय उरणार. हा संघर्ष अस्तित्वासाठी आहे. प्रशासन स्तरावरून योग्य ती कठोर कारवाई व्हावी यासाठी आपण लक्ष द्यावे. गेल्या वेळी पावसाळ्यात सागरी अतिक्रमणाचा फटका बसला त्यावेळी गाव वाचवण्यासाठी आपण दगड टाकून बंधारा उभारणी करत गावाला संरक्षण दिले. त्या ठिकाणी आ. नीलेश राणे यांच्या माध्यमातून बंधारा मंजूर झाला आहे तो लवकर पूर्ण व्हावा. गाव सुरक्षित व्हावे याबाबतही दत्ता सामंत यांचे लक्ष वेधण्यात आले.
आम्ही ग्रामस्थांच्या सोबत आहोत. आ. नीलेश राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे ग्रामस्थांचे निवेदन पोहोचवले जाईल. प्रशासन स्तरावरून निश्चितच योग्य ती कारवाई होईल. तसेच रेवंडी जेटीवरून मासे विक्रेत्या महिला व व्यावसायिकांना होणाऱ्या अटकाव बाबत माहिती बंदर अधिकाऱ्यांना देऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल.
- दत्ता सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख