

सावंतवाडी : राजकारणात कोणीही कोणाचा कायमस्वरुपी वैरी नसतो, असे सांगत शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी माजी आमदार राजन तेली यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाचे स्वागत केले. श्री. तेली यांच्या संघटनात्मक कौशल्याचा उपयोग करून सिंधुदुर्गात शिवसेना मजबूत करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ठाकरे शिवसेनेतून शिंदे शिवसेनेत दाखल झालेले राजन तेली शुक्रवारी सिंधुदुर्गात आले. यावेळी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत आ. राणे बोलत होते.
आ. राणे म्हणाले, विरोधात असताना राजन तेली यांनी शिवसेना नेते आ. दीपक केसरकर यांच्यावर सातत्याने टीका केली होती. मात्र राजन तेली आता शिवसेनेत आल्याने त्यांचे व आ. केसरकर यांचे संबंध अधिक घट्ट झालेले दिसतील, असा विश्वास आ. राणे यांनी व्यक्त केला. म्हणाले, राजन तेली हे जिल्ह्यातील प्रशासनाची जाण असलेले आणि विकासकामांची तळमळ असलेले ‘टॉप फाईव्ह’मधील नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या नॉलेज आणि अनुभवाचा फायदा घेऊन येणाऱ्या काळात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनेला बळ देण्यासाठी पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच जिल्ह्यात येणार असल्याची माहितीही आ. राणे यांनी दिली. तेली यांच्या प्रवेशानंतर अनेकजण शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत. त्यांचे लवकरच पक्ष प्रवेश घेण्यात येतील. कोणावरही जबरदस्ती केली जाणार नाही, पण जे कोणी आमच्याकडे येतील, त्यांना निश्चितच मान-सन्मान दिला जाईल, असे आश्ेवासन राणे यांनी दिले.
आ. नीलेश राणे यांनी राजन तेली यांच्यासोबतच्या जुन्या संबंधांना उजाळा दिला. तेली आणि माझे नाते हे गेले अनेक वर्षे कौटुंबिक राहिले आहे. माझी राजकीय ओळख नसताना नारायण राणे यांनी त्यांच्यावर माझी जबाबदारी दिली होती आणि त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली. म्हणूनच मी वयाच्या 28 व्या वर्षी खासदार होऊ शकलो, असे आ. राणे म्हणाले. आगामी काळातही त्यांची मदत निश्चित घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आ. राणे यांनी यावेळी सावंतवाडी मतदारसंघासह जिल्ह्यातील रोजगार आणि आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेत प्रवेश केलेल्या राजन तेली यांचे आ. दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी जल्लोषात स्वागत करण्यात आले. जिल्हाप्रमुख संजू परब, अशोक दळवी, बाबू कुडतरकर, दिनेश गावडे, नीता कविटकर, अनारोजीन लोबो यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.