

उदय बापर्डेकर
मालवण : मुसळधार पावसाने मालवण शहराला बुधवारी चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे मालवण शहर जलमय झाले होते. बाजारपेठ, बांगीवाडा, बस स्थानक परिसर पाण्याखाली गेला होता. दुपारनंतर पावसाने उसंत घेतली होती.
बुधवार सकाळ पासून मालवणात मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. यामुळे बाजारपेठेत गुडघाभर पाणी साचले होते. मालवण बस स्थानक समोरील परिसर, भंडारी हायस्कूल रोड ते बाजारपेठ, बांगीवाडा परिसर पाण्याखाली गेला होता. पाण्यातून मार्ग काढतांना वाहनचालक, पादचार्यांना कसरत करावी लागत होती. शहरातील गटारांची मर्यादा यानिमित्त उघड झाली. नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.
या मुसळधार पावसात शहरातील बांगीवाडा येथील माजी सैनिक शासकीय विश्रामगृहावर बाजूचे भलेमोठे चिंचेचे झाड कोसळले. सुदैवाने विश्रामगृहात कार्यरत कर्मचारी थोडक्यात बचावले. या दुर्घटनेत विश्रामगृहाच्या इमारतीचे सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सकाळी 11.30 वा. च्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये इमारतीच्या छप्पराचे व दोन खोल्यांचे नुकसान झाले. यावेळी विश्रामगृहातील एका खोलीत कार्यरत असलेले विश्रामगृह अधीक्षक अमर रेवंडकर, कर्मचारी गिरीश वराडकर, गोविंद गोसावी यांना सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही व ते सुखरूप खोलीच्या बाहेर आले.
याबाबत माहिती मिळताच तहसीलदार वर्षा झालटे यांच्या सूचनेनुसार शासकीय अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मंडळ अधिकारी पीटर लोबो व श्री. दळवी, पोलीस कर्मचारी सुशांत पवार यांनी पाहणी करत पंचनामा केला. या दुर्घटनेत विश्रामगृहाचे सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली. सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर, क्लार्क प्रसाद राणे, संघटक श्री. दळवी, कनिष्ठ सहायक श्री. नाठलेकर यांनी विश्रामगृहास भेट देऊन पाहणी केली. मालवण नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक संजय पवार, स्वच्छता मुकादम आनंद वळंजू व सफाई कर्मचारी यांनीही पाहणी केली.