

मालवण/ देवगड : महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण समुद्रात अंदाजे 6 ते 7 सागरी मैल क्षेत्रात अनधिकृतरीत्या पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करणार्या रत्नागिरी येथील तीन अनधिकृत पर्ससीन नौकांवर सहा. आयुक्त मत्स्य व्यवसाय, सिंधुदुर्ग यांनी कारवाई करत तीन नौका जप्त केल्या. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अधिनियम 2021 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी मालवण समुद्रात मत्स्य व्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर हे सहकार्यांसमेवत नियमित गस्त घालत होते. यावेळी रत्नागिरी येथील ‘सफा मारवा-3’, ‘राबिया अब्दुल’ व ‘जलसफर-2’ या तीन पर्ससीन नौका 6 ते 7 सागरी मैल क्षेत्रात अनधिकृत मासेमारी करताना आढळल्या. गस्ती पथकाने या तिन्ही नौका व त्यावरील सुमारे 65 खलाशी यांना ताब्यात घेतले. या नौका जप्त करून आनंदवाडी, देवगड बंदरात ठेवण्यात आल्या आहेत. नौकेवरील मासळीचा लिलाव करण्यात आला.
अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर यांनी मालवण पोलिस कर्मचारी कुंडलिक वानोळे तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक मालवण व देवगड यांचे सहकार्याने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी सहा. आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या कोर्टात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मत्स्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
आठवड्याभरापूर्वी राज्याचे मत्स्य व्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी अनधिकृत मच्छीमारी करणार्या ट्रॉलर्सवर कारवाई करा, असे आदेश दिल्यानंतरही सिंधुदुर्गच्या समुद्रात बेकायदेशीर पर्ससीन मच्छीमारी करणार्या ट्रॉलर्सचा धुमाकूळ सुरू राहिल्याने संतप्त पारंपरिक मच्छीमारांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.