

मालवण : मालवण नगरपालिकेच्या रणसंग्रामाला रंग चढवताना शिवसेना आ. नीलेश राणे यांनी कार्यकर्त्यांच्या जाहीर सभेत सडेतोड भाषण करून राजकीय वातावरण तापवले. ‘प्यादा वजीर होऊ शकतो पण वजीर कधीच प्यादा होत नाही’, हा प्यादा म्हणजे मालवणचा जनतेचा आत्मविश्वास आहे आणि तो वजीर होणारच, अशा शब्दांत आ. राणेंनी प्रतिस्पर्ध्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
शिवसेना प्रचार कार्यालयात झालेल्या सभेत आ. राणेंच्या भाषणाने अनेकांचा पारा चढवला. उपनेते संजय आंग्रे, जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, माजी आ. राजन तेली यासह मान्यवर उपस्थित होते.
शांत स्वभावाचा म्हणून ओळखला जाणारा नेता आपल्याला कोणी कमी लेखू नये, असा स्पष्ट इशारा देताना आ. राणे म्हणाले, मालवणसाठी शांत राहिलो, पण कुणी उगाच वातावरण बिघडवायला नको. आम्ही बिघडू देणार नाही.
महायुती आकाराला न येण्यामागील पडद्यामागील घडामोडी सांगताना राणे म्हणाले, मी दोन पराभव पाहिले आहेत. युती झाली असती तर कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला असता. पण काहींच्या घमेंडी, फुकटच्या आत्मविश्वासाच्या इगोमुळे युती तुटली. कार्यकर्त्यांपेक्षा काहींचा अहंकार मोठा झाला. खा. नारायण राणे यांची इच्छा युती करण्याची होती, मात्र काहींनी तीच मोडून काढली. ही निवडणूक आमची नाही, कार्यकर्त्यांची आहे; आणि ती कार्यकर्त्यांच्या जिद्दीवर जिंकली जाणार आहे, असा विश्वास राणेंनी व्यक्त केला.
खा. नारायण राणेंचा शब्द पडू देणार नाही. मालवण नगरपालिका राणे साहेबांना भेट म्हणून देणार, अशी घोषणा केली. नगरपालिकेचा कारभार पवित्र मानत आ. राणेंनी भ्रष्टाचारावरही जोरदार शाब्दिक प्रहार केला.