

Sawantwadi 700 years Ganesh Chaturthi
अजय गडेकर
वेंगुर्ले: सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावातील माळीचे घर हे गेली तब्बल सातशे वर्षांपासून सामूहिक गणेशोत्सवाची अखंड परंपरा जपत आले आहे. एक, दोन नव्हे तर तब्बल ८० राऊळ कुटुंबांची सामूहिकता या उत्सवातून आजही कौटुंबिक एकतेचे उत्तम उदाहरण घालून देते.
मळगाव व सोनुर्ली या गावांचे दैवत असलेल्या श्री देवी माऊलीसह श्री देव रवळनाथ, भूतनाथ, मायापूर्वचारी आणि दोन पूर्वस या देवस्थानांच्या बरोबरीने माळीचे घर हे गावातील पाचवे देवस्थान म्हणून प्रसिद्ध झाले आहे. गणेशोत्सवामुळेच हे घर आणि त्याचा वारसा संपूर्ण सावंतवाडी तालुक्याचे धार्मिक भूषण ठरले आहे.
या गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये म्हणजे – मूर्ती घरच्याच मंडळींकडून शाडूच्या मातीने साकारली जाते, डोळ्यांची नजर मात्र चतुर्थीच्या पहाटेला पारंपरिक कारागिरांकडून दिली जाते. सात दिवस चालणाऱ्या या उत्सवात दररोज आरती, भजन, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक उपक्रमांनी घरातील वातावरण भक्तीमय होते.
पहिल्या दिवशी सात नेवैद्यांचा नैवेद्य दाखविला जातो, आणि या नैवेद्यातूनच सामूहिक भोजनाचा आनंद घेतला जातो. प्रत्येक घरातून गणरायाला आवडता नैवैद्य अर्पण केला जातो, त्यामुळे कुटुंबातील सर्वांचा उत्सवात सहभाग जपला जातो.
सावंतवाडी शहराच्या पश्चिम सीमेला लागून असणारे मळगाव हे गाव येथील रेल्वे स्थानकामुळे देशाच्या नकाशावर रेखाटले आहे. या गावात दहा वाड्यांचा समावेश असून लोकसंख्या सुमारे सहा हजाराच्या आसपास आहे. गावाच्या उत्तर दिशेला माळीचे घर वसले असून या परिसरात राऊळ कुटुंबांची जवळपास सहाशेच्या आसपास लोकवस्ती आहे. या कुटुंबियांमधील प्रत्येक घरातील किमान निम्मे तरी कामानिमित्त पुणे-मुंबई येथे स्थायिक झाले आहेत.
माळीच्या घरातील राऊळ बांधव कामानिमित्त दूरदूर स्थायिक झाले असले तरी होळीपौर्णिमा, नागपंचमी, अष्टमी आणि विशेषतः गणेशोत्सवाला सर्व मंडळी एकत्र येतात. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तरुण व लहानग्यांसह सर्वजण उत्सव साजरा करतात.
गणरायाच्या विसर्जनावेळी ढोल-ताशांच्या गजरात, भावनिक वातावरणात गणेशाची प्रतिमा निरोप घेतली जाते आणि पुन्हा पुढच्या वर्षी भेटायची आस उराशी बाळगून सर्व बांधव आपापल्या कामाला निघतात.
मळगाव पंचक्रोशीतील पाचवे मंदिर म्हणून ओळखले जाणारे हे घर आता भाविकांचे मोठे श्रद्धास्थान झाले आहे. श्रद्धा, परंपरा, भक्ती आणि कौटुंबिक एकतेचा अद्वितीय वारसा जपणारे हे माळीचे घर आजही कोकण संस्कृतीचे अभिमानस्थान मानले जाते.